News Flash

श्वानांना ‘डिस्टेंपर’ विषाणूचा धोका

ठाणे शहरातील भटक्या श्वानांना कॅनाइन डिस्टेंपर विषाणूचा (सीडीसी) विळखा बसू लागला आहे.

गेल्या आठवडय़ाभरात ० ते ६ महिन्यांच्या वयोगटातील १३ भटक्या श्वानांना हा आजार बळावला असून त्यातील दोन श्वानांचा मृत्यू झालेला आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे शहरातील भटक्या श्वानांना कॅनाइन डिस्टेंपर विषाणूचा (सीडीसी) विळखा बसू लागला आहे. गेल्या आठवडय़ाभरात ० ते ६ महिन्यांच्या वयोगटातील १३ भटक्या श्वानांना हा आजार बळावला असून त्यातील दोन श्वानांचा मृत्यू झालेला आहे. हा विषाणू संसर्गजन्य असून यामुळे श्वानांच्या संपर्कात येणाऱ्या इतर प्राण्यांनाही यापासून धोका निर्माण होऊ लागला आहे.

ठाणे शहरात २० हजारहून अधिक भटक्या श्वानांची संख्या आहे. करोनाच्या प्रादुर्भावानंतर या श्वानांना बराच काळ खाण्यासाठी पुरेसे अन्न मिळाले नव्हते. रहिवाशांचा बाहेरील वावर कमी झाल्याने अनेक भटक्या श्वानांवर उपासमारीची वेळ ओढावली. वेळेवर अन्नपदार्थ मिळत नसल्याने श्वानांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली आहे, असे निरीक्षण प्राणीप्रेमी संघटनांकडून नोंदविले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वानांमध्ये कॅनाइन डिस्टेंपर या विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर आढळू लागला असून रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे असे होत आहे, असे निरीक्षण ठाणे शहरातील काही प्राणीप्रेमी

संस्थांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे नोंदविले आहे. गेल्या आठवडय़ाभरात    अशा प्रकारच्या १३ नोंदी सिटीझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन  (कॅप) या संस्थेला मिळाल्या आहेत.

त्यापैकी दोन श्वानांचा मृत्यू झालेला असून त्यांचे वयोगट अवघे सहा महिने आहे. हा आजार वाढत असताना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून या प्रकरणांची पुरेशी दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी श्वानप्रेमींकडून पुढे येत आहेत.

दरम्यान, या विषाणूच्या उपचारासाठी महापालिकेकडे स्वतंत्र कक्ष नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.

कॅनाइन डिस्टेंपर काय आहे?

  • कॅनाइन डिस्टेंपर या विषाणूचा प्रादुर्भाव ० ते १ वर्षे वयोगटातील आणि नऊ वर्षांपेक्षा अधिक वयोगटात असलेल्या श्वानांना सर्वाधिक होत असतो.
  • ज्या श्वानांचे लसीकरण झालेले नसते. त्या श्वानांना हा आजार बळावत असतो. श्वानांच्या पायांची हालचाल न होणे तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे अशा पद्धतीची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ या प्राण्यांना हाताळणे टाळावे.
  • श्वान ज्या जागेत बसले होते, त्या भागात फवारणी करावी, अशी माहिती सिटीझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेचे सदस्य प्रणव त्रिवेदी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:25 am

Web Title: distemper virus fear in dogs dd 70
Next Stories
1 ४५० जणांचे लसीकरण
2 फेब्रुवारीत करोनाच्या रुग्णसंख्येत ४६ ने वाढ
3 वाढत्या आठवडा बाजाराने पुन्हा करोना प्रसाराची भीती
Just Now!
X