News Flash

माणकोली, तळोजा फाटा येथे वाहतूक पोलिसांची वाटमारी!

मालवाहू वाहन घेऊन एकदा ठाणे हद्दीत प्रवेश केला की, किमान दोन हजार रुपये विविध नाक्यांवर मोजावे लागतात.

परप्रांतातून येणारे मालवाहू वाहनचालक हैराण

कल्याण : टाळेबंदीच्या काळात ठाण्यातील डान्सबारना मोकळे रान उपलब्ध करून देणाऱ्या पोलिसांचा कारभार वादात सापडला असताना माणकोली, नारपोली नाका तसेच काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी-तळोजा फाटा येथे रात्रीच्या वेळेत उद्योगांना लागणारा पक्का तसेच कच्चा माल घेऊन येणारे अवजड वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या दंडेलशाहीमुळे अक्षरश: हैराण झाले आहेत. परप्रांतामधून रात्री १० वाजल्यानंतर अवजड वाहने मोठय़ा प्रमाणावर येतात. या वाहनांमुळे वाहतुकीचे नियोजन बिघडू नये यासाठी तैनात करण्यात येणारे वाहतूक पोलीसच कोंडीसाठी कारणीभूत ठरू लागले आहेत.

या ट्रकचालकांकडून या दोन्ही नाक्यांवरील वाहतूक पोलिसांची फौज आणि त्यांच्या साथीला टोईंग व्हॅनचालक वाहनचालकांची चूक नसताना त्यांच्याकडून ६०० ते ८०० रुपयांची वसुली करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या वसुली आणि उपद्रवाचा वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करण्याची मागणी मालवाहू वाहतूकदारांकडून केली जात आहे. हा अनुभव नेहमीच घेणाऱ्या एका परप्रांतीय वाहनचालकाने सांगितले, रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची एक फौज आणि त्यांच्या जोडीला टोईंग व्हॅनचालक ही वसुली करत आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यांत आम्ही नेहमी मालवाहतूक करतो. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येताच वाहतूक पोलिसांकडून होणारी एवढी दादागिरी आम्ही कुठेच पाहात नाही, असे काही मालवाहतूकदारांनी लोकसत्ताला सांगितले.

मालवाहू वाहन घेऊन एकदा ठाणे हद्दीत प्रवेश केला की, किमान दोन हजार रुपये विविध नाक्यांवर मोजावे लागतात. चूक नसताना ही रक्कम वसूल केली जाते, असे एका वाहनचालकाने सांगितले. माणकोली नाका, खोणी-तळोजा फाटा येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हातात काठी असते. मालवाहू वाहन नाक्यावर आले की दोन वाहतूक पोलीस ट्रकजवळ येतात. कागदपत्रांची तपासणी करतात. त्यात काही आढळले नाही की काही तरी चूक शोधण्याचा प्रयत्न करतात. ती सापडली नाही की वाहनात साहित्य काय आहे ते तपासायचे आहे असे सांगून वेळकाढूपणा करत अचानक हातात टोईंग व्हॅनची ८०० रुपयांची पावती क्लिनरच्या हातावर टेकवतात. एवढी रक्कम देणार नाही आणि ही पावती कसली असा प्रश्न चालक किंवा त्याच्या सहकाऱ्याने केला की त्याला शिवीगाळ किंवा हातामधील काठीचा फटका मारतात. उगाच वाद नको म्हणून चालक पैसे देऊन ती पावती स्वीकारतो. गाडी टो करून बाजूला केली आहे, असा पावतीवर शेरा असतो. प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार माणकोली, नारपोली किंवा खोणी-तळोजा फाटय़ावर झालेला नसतो. तरी जबरदस्तीने चालकाच्या हातात ६०० ते ८०० रुपयांची पावती टेकवली जाते. ट्रकमध्ये अत्यावश्यक सेवेचा, औषध किंवा नाशिवंत माल असतो. तो वेळेत घटनास्थळी पोहचविणे आवश्यक असते. त्याची पर्वा वाहतूक पोलीस करत नसल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत.

रात्रीपासून पहाटेपर्यंत वसुली; वाहनचालकांकडून तक्रारी

गेल्या आठवडय़ात गुजरातमधून ऑक्सिजन प्रकल्पाच्या सुटय़ा भागांचे साहित्य घेऊन एक ट्रक कल्याणमध्ये आला होता. माणकोली नाक्यावर या ट्रकला वाहतूक पोलिसांनी अडविले. चालकाने गाडीत महत्त्वाच्या प्रकल्पाचे साहित्य आहे, मला जाऊ द्या, तातडीने माघारी जायचे आहे, असे सांगितले. तरी तेथील गस्तीवरील वाहतूक पोलिसाने शिवीगाळ करत जबरदस्तीने ८०० रुपयांची पावती हातात टेकवली. पैसे दिले नाही तर ट्रक बाजूला उभा करा, अशी सूचना केली, असा अनुभव एका ट्रकचालकाने सांगितला. माणकोली, तळोजा फाटा येथील नाक्यांवर रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक पोलीस टोईंग व्हॅन सेवेच्या नावाखाली ६०० ते ८०० रुपये वसूूल करत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरांतील मालवाहतूकदारांकडून केली जाते. ट्रक रात्री-अपरात्री अडविला की चालक मालकाशी संपर्क करतो. अनेक वेळा वाहतूक पोलीस चालकाने लावून दिलेल्या मोबाइलवर बोलण्यास नकार देतो. मालकाला तेवढय़ा रात्री नाक्यावर जावे लागते. घटनास्थळी गेले की पावती न फाडता वाहतूक पोलीस ट्रक सोडून देतात, असा अनुभव डोंबिवलीतील एका वाहतूकदाराने सांगितला. माणकोली, तळोजा फाटा नाक्यांवर रात्रीच्या वेळेत होणारी ही वसुली कशाच्या आधारे होत आहे असा सवाल आता उपस्थित होत असून या भागातून दररोज ये-जा करणाऱ्या इतर प्रवासीदेखील या प्रकारांचे साक्षीदार ठरू लागले आहेत.

महामार्ग किंवा वर्दळीच्या रस्त्यावर काही अवजड, मालवाहू वाहने बंद पडतात. ती वाहने बाजूला करण्यासाठी टोईंग व्हॅन तपासणी नाक्यांवर तैनात असतात. टोईंग व्हॅनचालक आणि वाहतूक विभागाचे करार झालेले आहेत. काही ट्रकचालक वाहनतळ नसताना वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. अशांवर कारवाई केली जाते. काही टोईंग व्हॅनचालक पावतीचा दुरुपयोग करत असतील. वाहतूक पोलिसांकडून ट्रकचालकाला अरेरावी करून पावती फाडण्यात येत असेल तर त्याची चौकशी करतो. तात्काळ हा प्रकार थांबविण्याचे आदेश देतो.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:31 am

Web Title: distribution of traffic police at mankoli taloja fata ssh 93
Next Stories
1 ३३६ विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी दात्यांचा पुढाकार
2 उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चार जणांचे निलंबन
3 ठाणे डान्स बार प्रकरणी चार कार्यक्षेत्रीय अधिकारी निलंबित!