‘राष्ट्रीय दिनदर्शिके’प्रमाणे ग्राहकाचे धनादेश स्वीकारण्याचे आदेश
‘व्होडाफोन’ कंपनीचा भ्रमणध्वनी वापरणाऱ्या डोंबिवलीतील एका ग्राहकाने देयकाच्या धनादेशावर राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे तारीख लिहून व्होडाफोन कंपनीच्या केंद्रात धनादेश भरणा केला. कंपनीने ‘चुकीची तारीख’ असा शेरा मारून तो धनादेश ग्राहकाला परत पाठविला. राष्ट्रीय दिनदर्शिकेतील तारीख लिहिलेले धनादेश स्वीकारावेत, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे परिपत्रक ग्राहकाने व्होडाफोन कंपनीला दिले पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याऊलट ग्राहकाला पुन्हा थकीत देयक पाठवून ते वसूल करण्याचा प्रयत्न कंपनीने केला.
याप्रकरणी ग्राहकाने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मंचाने सर्व बाजू तपासून भ्रमणध्वनी ग्राहकाला व्होडाफोन कंपनीने सात हजार रुपये व वेळेत ही रक्कम न दिल्यास या रकमेवर नऊ टक्केप्रमाणे व्याज आकारण्याचे आदेश दिले. मंचाच्या अध्यक्षा स्नेहा म्हात्रे, ना. द. कदम यांच्या समक्ष सदस्या माधुरी विश्वरूपे यांनी हा निर्णय दिला.
डोंबिवलीतील नांदिवली भागातील सर्वोदय पार्क सोसायटीत श्रीपाद बामभोरीकर राहतात. ते व्होडाफोन कंपनीचा भ्रमणध्वनी वापरतात. जानेवारी २०१४ मध्ये कंपनीने बामभोरीकर यांना वापरलेल्या कॉल्सचे ४९७ रुपयाचे देयक पाठविले. बामभोरीकर यांनी धनादेशावर राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे ७ माघ १९३५ (म्हणजे २७ जानेवारी २०१४) अशी तारीख लिहून धनादेश व्होडाफोनच्या सेंटरमध्ये वटविण्यासाठी दिला. चुकीची तारीख असा लघुसंदेश कंपनीने ग्राहकाला पाठविला. बामभोरीकर यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन भारत सरकार १९५७ पासून राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वापर करीत आहे. ती ग्राह्य़ तारीख आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. कंपनीने त्यास दाद दिली नाही.
बामभोरीकर यांनी यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) तक्रार केली. ‘ट्राय’ने व्होडाफोनला ग्राहकाचे धनादेश राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या तारखेप्रमाणे बँकेत वटविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कंपनीने बँकेत धनादेश वटविले आणि ती रक्कम कंपनी खात्यावर जमा झाली. तरीही, व्होडाफोनने पुन्हा बामभोरीकर यांना थकीत देयकाचे ८५२ रुपयांचे देयक पाठविले. ग्राहकाचे धनादेश सीटी बँकेत वटविण्यासाठी पाठविले होते. ते बँकेने वटविण्यासाठी पाठविले नाहीत, असा पवित्रा कंपनीने ग्राहक मंचासमोर घेतला.
७ हजार रुपयांचा दंड
कंपनी आपणास नाहक त्रास देत आहे हे पाहून बामभोरीकर यांनी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. मंचाने कंपनी व ग्राहकाचे म्हणणे ऐकून घेतले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे तारीख असलेले ग्राहकाचे धनादेशाचे देयक स्वीकारणे बंधनकारक आहे, असे मत व्यक्त करीत मंचाच्या सदस्या माधुरी विश्वरुपे यांनी, ग्राहकाने विहित प्रक्रियेत देयक भरण्याची कृती करूनही व्होडाफोन कंपनीने त्यांना नाहक त्रास दिला म्हणून मानसिक त्रास व खर्चापोटी ७ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. ही रक्कम ३१ मार्चच्या आत दिली नाहीतर १ एप्रिलपासून या रकमेवर ९ टक्के व्याज आकारण्याचे आदेश दिले.

कॉर्पोरेट कंपन्यांना भारतीय व्यवहार काय असतो हे कळण्यासाठी प्रत्येक भारतीयाने धनादेशच नाही तर प्रत्येक कागदोपत्री व्यवहारावर राष्ट्रीय दिनदर्शिकेतील तारखेचा वापर केला पाहिज.
-श्रीपाद बामभोरीकर