|| जयेश सामंत-ऋषीकेश मुळे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपच्या खेळीने शिवसेनेची भंबेरी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांचे विलीनीकरण करून एकत्रितपणे परिवहन प्राधिकरण स्थापन करण्याची जोरदार मागणी भाजपच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. भाजपच्या या मागणीमुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या परिवहन उपक्रमांमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेनेची भंबेरी उडाली. मात्र शासनापुढे या संबंधीचा फेर प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ मारून नेली.

ठाणे जिल्ह्यातील नियोजनासंबंधी ठोस धोरण आखण्यासंबंधी नियोजन समितीची बैठक महत्त्वाची मानली जाते. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार तसेच वेगवेगळ्या प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित असतात. त्यामुळे या बैठकीतून पुढे येणारे मुद्दे जिल्ह्यातील विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरतात. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुंबई महानगर क्षेत्रातील परिवहन उपक्रमांचे विलीनीकरणाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला होता. हे विलीनीकरण करून एकत्रित परिवहन प्राधिकरण स्थापन करण्याचा हा प्रस्ताव होता. अशा विलीनीकरणास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची संमती घेतली जावी अशी अट टाकण्यात आली होती. मात्र, परिवहन समित्यांच्या माध्यमातून समर्थकांची राजकीय सोय लावली जात असल्याने ठाणे, नवी मुंबईसह महानगर क्षेत्रातील सर्वच महापालिकांमधील लोकप्रतिनिधींनी असा ना हरकत दाखला देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील परिवहन उपक्रमांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची कामे होत असतात. ही कामे स्थानिक सत्ताधाऱ्यांसाठी आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाची ठरत असतात. त्यामुळे परिवहन प्राधिकरणाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. त्यातच भाजपने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

वाढत्या नागरीकरणाला अनुसरून अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत याकरिता ठाण्यातील एमएमआर क्षेत्राला अनुसरून एकच सक्षम प्राधिकरण सेवा स्थापन करावी अशी मागणी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी नियोजन समितीच्या बैठकीत केली. . ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात ४६७ आणि कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात १३८ बसगाडय़ा आहेत. तर नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात ४५० इतक्या बसगाडय़ा आहेत. मात्र अनेकदा या बसगाडय़ा तांत्रिक कारणांमुळे बंद पडतात. प्रवाशांच्या तुलनेत बसगाडय़ा अपुऱ्या पडून प्रवाशांचे हाल होत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकत्रित प्राधिकरण स्थापन करावा असा आग्रह केळकर यांनी घरताच भाजपच्या आमदारांनी त्यास पाठिंबा दिला. दरम्यान, या नव्या प्रस्तावावर विचार करू असे सांगत पालकमंत्र्यांनी मात्र वेळ मारून नेली.

१० वर्षांपूर्वीदेखील आमदार असताना परिवहन सचिवांकडे स्वतंत्र परिवहन प्राधिकरणाची मागणी करण्यात आली होती. मात्र त्या वेळी या मागणीला गांभीर्याने घेतले गेले नाही. मात्र एमएमआर क्षेत्रातील नागरीकरण वाढले असून स्वतंत्र सक्षम परिवहन प्राधिकरण होणे गरजेचे आहे. – संजय केळकर, आमदार, ठाणे शहर