मुसळधार पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे ते बोरीवली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाण्यात घोडबंदर रोड मार्गावरील चेना नदीला पूर आल्याने पूलावरुन पाणी वाहत आहे. परिणामी भाईंदर आणि बोरीवली मार्गे ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ठाणे-खारेगाव टोलनाका मार्गे कल्याण बायपास येथेही वाहतूक कोंडी निर्माण झाली.

ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्यानंतर अनेक चाकरमान्यांनी लोकलने प्रवास करणे टाळले. बुधवारी ठाण्यात १०८.०० मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा ठाण्यात ३४१९ मिमी पाऊस पडला, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती नियंत्रन कक्षाने दिली आहे. तसेच येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याचा वेधशाळेने इशारा दिला आहे. ठाण्यात वंदना सिनेमा, श्रीनगर , मुंब्रा परिसर, चंदनवाडी, राबोडी, नौपाडा, कासारवडवली बाजारपेठेत जागोजागी पाणी साचले आहे. तसेच या पावसामुळे ठाणे श्रीरंग सोसायटी, ब्रम्हांड, कापूरबावडी, आझाद नगर, कोलशेत, कोपरी, ठाणेकरवाडी, चेंदणी कोळीवाडा, टीएमटी बसडेपो, वागळे मेंटल हॉस्पिटल आदी विविध ठिकाणी झाडाच्या फांदया पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवितहानी टळली.

कल्याण तालुक्यातील १२ गावांचा संपर्क तुटला
कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीकचा काळू नदीवरील रूदे गावालगतचा पूल पाण्याखाली गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. यंदाच्या पावसात सहा ते सात वेळा हा पुल पाण्याखाली गेला.आहे. रूदे, फळेगांव, आंबिवली, दानबाव, मढ, उशीद हाळ, पळसोली, आरोळा, भोंगळपाडा, आदी १० ते १२ गावांचा दुपारपासून टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. संपर्क तुटलेल्या गावातील लोकांना पर्यायी रस्ता खडवली मार्गी पंधरा ते वीस किमीचा अंतर पार करून आपल्या घरी पोहचावे लागेल. परंतु ज्यांच्याकडे खाजगी वाहने असतील त्यांनाच या मार्गी आपल्या घरी पोहचता येईल. कारण खडवली- फळेगांव-उशीद ही एसटी बससेवा दोन वर्षापासून बंद आहे. तसेच या ठिकाणी रिक्षा वाहतूक देखील कमी प्रमाणात आहे.