नागरिकांचे आज आंदोलन; कारवाईची मागणी

दिवा परिसरातील घरमालकांना जास्त भाडे देणारे नायजेरियन नागरिक आता स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. रस्त्यावरच अमली पदार्थ तसेच मद्याचे सेवन करणे आणि त्यानंतर नशेच्या अमलाखाली उशिरापर्यंत गोंगाट करणे या प्रकारांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे दिवा पूर्व स्थानकाबाहेर आज आंदोलन करण्यात येणार आहे.

दिवा परिसरात वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांची संख्या सुमारे एक हजारच्या घरात गेली असून त्यापैकी काही नागरिक बेकायदा वास्तव्य करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या नागरिकांची परिसरात दादागिरी वाढू लागली आहे. तसेच अमली पदार्थ विक्री, चोरी, फसवणूक अशा गुन्ह्य़ांमध्ये या टोळ्यांचा सहभाग असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. नायजेरियन व्यक्तीने पोलिसाला चावा घेतल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. त्यामुळे दिवा भागातून या नागरिकांना हाकलून द्यावे आणि नागरिकांना दहशतीच्या वातावरणातून मुक्त करावे, यासाठी हिंदू जनजागृती समितीमार्फत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे नरेंद्र सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नायजेरियन नागरिक जास्त भाडे देत असल्याने त्यांना वास्तव्यासाठी घरे मिळतात. विशेष म्हणजे, हे नागरिक सोसायटीमधील गच्चीही भाडय़ाने विकत घेतात आणि तिथेच त्यांचा रात्रभर गोंधळ सुरू असतो, असेही त्यांनी सांगितले. घर भाडय़ाने देताना त्याची नोंदणी पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक आहे, मात्र अनेकांनी त्याची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा मालकांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

दिव्यातील रस्त्यावर नायजेरियन नागरिक बिनधास्तपणे अमली पदार्थ तसेच मद्याचे सेवन करताना दिसून येतात. या नशेच्या अमलाखाली रात्री उशिरापर्यंत गोंगाट आणि हाणामारी करणे, असे प्रकार त्यांच्याकडून सुरू असतात. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी महादेव बनसोडे यांनी दिली.