थांब्यांतील दिशेत बदल झाल्याने प्रवाशांना चढणे-उतरणे सोयीचे

आधी कळवा, मग मुंब्रा आणि त्यापाठोपाठ दिवा स्थानकांत एकाच दिशेच्या दारांवर चढण्या-उतरण्यासाठी होणारी प्रवाशांची झुंबड आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणावाचे प्रसंग यातून आता दिवावासीयांची काही अंशी सुटका झाली आहे. दिवा स्थानकात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फलाट क्रमांक एकमुळे धिम्या मार्गावरील डाऊन गाडय़ांच्या थांब्यात दिशाबदल झाला आहे. आतापर्यंत ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांत एकाच बाजूला थांबा येत असल्याने त्या बाजूच्या दारांवर मोठी गर्दी उसळत असे. मात्र, आता दिवा स्थानकात वेगळ्या दिशेला थांबा येत असल्याने येथील प्रवाशांना चढणे-उतरणे सोयीचे झाले आहे. विशेष म्हणजे, ठाण्यातून कल्याणकडे जाणाऱ्या गाडय़ा पकडणाऱ्या प्रवाशांचीही यामुळे अप्रत्यक्षपणे जाचातून सुटका झाली आहे.

दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठीचे काम प्रगतिपथावर असून रविवारी या कामातील डाऊन धिम्या मार्गाची जोडणी नव्याने तयार केलेल्या मार्गाशी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जोडणीमुळे फलाट क्रमांक एक नव्याने तयार झाला असून पूर्वीचा फलाट क्रमांक एक हा फलाट क्रमांक दोन म्हणून ओळखला जाणार आहे. या फलाट बदलामुळे दिवा येथे धिम्या डाऊन मार्गाच्या गाडय़ांच्या थांब्याची दिशा बदलली आहे. पूर्वी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांत फलाट एकाच दिशेला येत असल्याने त्या बाजूच्या दारांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळत असे. तर दुसऱ्या बाजूची दारे मोकळी राहत असत. आता दिव्यात उलट बाजूला फलाट येत असल्याने तेथील प्रवाशांना चढणे, उतरणे सोयीचे झाले आहे.

रखडलेल्या पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी २०१७ ची वाट पाहण्याची शक्यता रेल्वेकडून व्यक्त होत असली तरी दिव्यात रविवारी सुरू करण्यात आलेल्या नव्या फलाटाचा तात्पुरता फायदा प्रवाशांना होऊ लागला आहे.

 

ठाण्यातील प्रवाशांनाही फायदा

ठाण्याकडून कल्याणकडे येणाऱ्या संध्याकाळच्या गाडय़ांचा ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिव्यापर्यंत एकाच दिशेला फलाट येत असल्यामुळे दरवाजावर मोठी गर्दी होऊन ठाण्यात प्रवाशांना गाडीत चढणे शक्य होत नव्हते. दिव्यात उतरणाऱ्यांची गर्दी या प्रवाशांना चढूच देत नव्हती. अशा वेळी अनेक वादावादीचे प्रसंग घडत असत. हा प्रकार आता काही अंशी थांबण्याची शक्यता आहे.

दिव्यातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेची रखडलेली कामे आत्ता वेगात मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या रेल्वेकडून दहा जलदगाडय़ांना दिव्यात थांबा देण्याचा विचार व्यक्त केला जात आहे. मात्र दिव्याची एकूण मागणी लक्षात घेता गर्दीच्या काळात दहापेक्षाही अधिक गाडय़ा थांबण्याची गरज आहे. रविवारच्या मेगा ब्लॉकदरम्यान नव्या फलाटांवर काही जलद गाडय़ांना थांबा देण्यात येत होता. त्यामुळे दिवावासीय सुखावले असले तरी दिव्यावरून सुटणारी लोकल आणि १० पेक्षा अधिक गाडय़ांना दिवा स्थानका थांबा या मागण्या पुढील काळात जोरदारपणे रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात येतील.

– आदेश भगत, दिवा रेल्वे प्रवासी संघटना