दिवा रेल्वे स्थानकातील कामामुळे फलाटावरील छताचे पत्रे हटवले; प्रवाशांना उन्हाचा तडाखा
तळपणाऱ्या सूर्यामुळे अंगाची काहिली होत असल्याने दुपारच्या वेळी रेल्वे स्थानकात सावलीच्या शोधात असलेल्या दिवावासीयांची पुरती निराशा होत आहे. दिवा रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे संपूर्ण फलाटावरील पत्रे हटवण्यात आल्याने प्रवाशांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. दिव्याबरोबरच ठाणे, कल्याण आणि कल्याण पलीकडच्या अनेक स्थानकातही छत उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रवासी संघटनांनी ही कामे तात्काळ पूर्ण करून प्रवाशांना छत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दिवा रेल्वे स्थानकात सध्या स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ठाण्याच्या दिशेकडून स्थानकाची लांबी कमी करून कल्याणच्या दिशेने स्थानक वाढवले जात आहे. तसेच धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या गाडय़ा थांबवण्याच्या दृष्टीनेही फलाट लांब केले जात आहे. प्रत्येक फलाटावर वेगवेगळी कामे सुरू असून त्यामुळे दिवा स्थानकाचे छत हटवण्यात आले आहे. त्यामुळे दिवा स्थानक उघडेबोडके झाले आहे.
फलाटावर उन्हाच्या झळा लागत असल्याने येथून प्रवास करणारे प्रवासी सकाळी ९ नंतर अक्षरश: भाजून निघतात. दिवा स्थानकातून सकाळच्या वेळात डोंबिवलीकडे जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. हे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठय़ा संख्येने फलाट क्रमांक एकवरून प्रवास करत असतात.
यावेळेत ठाण्याकडून डोंबिवलीकडे जाणारी संख्या विरळ असल्याने या मुलांना उन्हातान्हात तापत बसावे लागते. तर अन्य फलाटांची परिस्थितीही दयनीय आहे. छताचे काम पूर्ण होण्यासाठी काम केले जात असले तरी त्याचा वेग लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत स्थानकावरील ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे उन्हाच्या झळा आणि पुढे पावसाचे संकटसुद्धा प्रवाशांवर घोंगावू लागल्याने ही कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी दिवा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेकडे करण्यात आली आहे.

पुढे पाऊसही झेलायचाय..
ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम सुरू असून पुलास अडथळा ठरणारे सर्व फलाटावरील पत्रे काढण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे स्थानकातील अवस्थाही दिव्यापेक्षा वेगळी नाही. तर कल्याण स्थानकातही सुरू असलेल्या पादचारी पुलासाठी छत हटवण्यात आले आहे. डोंबिवली स्थानकातील वाढीव फलाटावर अद्याप छत उभारण्यात आलेले नाही. तर कल्याण पलीकडच्या अनेक स्थानकात अद्याप छत उपलब्धच झालेले नाही. त्यामुळे उन्हाच्या झळा सहन करणारे प्रवासी पावसाळ्यात भिजत प्रवास करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात सध्या सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात आली आहे.