News Flash

ठाणे वाहतूक शाखेचे विभाजन?

विभागांसाठी स्वतंत्र अतिरिक्त आयुक्तपद निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सिंग यांनी दिली.

ठाणे वाहतूक पोलीस

ठाणे आणि कल्याण दोन परिमंडळे
स्वतंत्र अतिरिक्त आयुक्त पदांची निर्मिती
ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्व शहरांतील वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी असलेल्या ठाणे वाहतूक विभागावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे वाहतूक शाखेचे नियोजन करण्याचा निर्णय ठाणे पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले. या प्रस्तावानुसार वाहतूक शाखेचे विभाजन करून ठाणे व कल्याण परिमंडळे तयार करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र अतिरिक्त आयुक्तपदाची निर्मिती करण्यात येईल, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी अशा सर्वच शहरांत वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. या सर्व शहरांतील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तावर आहे. मात्र ही शहरे एकमेकांपासून दूर अंतरावर असल्याने प्रत्येक वेळी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास घटनास्थळी पोहचणे शक्य होत नाही. वाहतूक शाखेत जेमतेम साडेपाचशे पोलीस अधिकारी-कर्मचारी कार्यरत असून त्यांना शहरांतील वाहतूक कोंडीचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वाहतूक शाखेचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावानुसार ठाणे आणि कल्याण अशी दोन परिमंडळे तसेच या विभागांसाठी स्वतंत्र अतिरिक्त आयुक्तपद निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सिंग यांनी दिली.
पोलीस यंत्रणेवर वाढता भार
*ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे असून त्या  अंतर्गत एकूण ३३ पोलीस ठाणी येतात.
*आयुक्तालयात क्षेत्रातील लोकसंख्येचा आकडा सुमारे ८० ते ८५ लाखांच्या घरात गेला आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याची  निर्मिती सुमारे दोन ते अडीच लाख लोकसंख्येच्या रचनेनुसार करण्यात आली आहे.
*मात्र लोकसंख्येच्या मानाने पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असून संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रातील  अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकडा सुमारे साडेनऊ हजार इतका आहे. त्यामध्ये सुमारे १३०० महिला पोलिसांचा समावेश आहे.
*त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा असल्याचे चित्र आहे.
*मुंबई शहराची लोकसंख्या सव्वा कोटींच्या घरात असून त्यांच्या सुरक्षेकरिता मुंबई पोलिसांकडे ४५ हजार पोलिसांचा  फौजफाटा आहे.
*त्यापैकी नऊ हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी वाहतूक शाखेत कार्यरत असून या विभागाच्या कारभारासाठी स्वतंत्र  सहपोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत ठाणे पोलिसांकडे अपुरे पोलीस बळ  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:21 am

Web Title: division of thane police
Next Stories
1 येता गुलाबी थंडी, महाग होती अंडी
2 आगरी महोत्सवात महागडय़ा गाडय़ांची विक्री
3 नवअंबरनाथकर प्रदूषणाच्या विळख्यात
Just Now!
X