14 December 2017

News Flash

ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

नवरात्रोत्सवाच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नियम डावलून ध्वनिप्रदूषण करण्यात आले.

प्रतिनिधी, उल्हासनगर | Updated: October 7, 2017 3:52 AM

मध्यवर्ती रुग्णालयाशेजारी फटाके फोडणाऱ्या मंडळ उपाध्यक्षावर कारवाई

ध्वनिप्रदूषणावरून वादात सापडलेल्या उल्हासनगरच्या परिमंडळ-४ च्या पोलिसांनी आता ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यात कॅम्प क्र. चारच्या गुरूसिंग सभा गुरूव्दारातील सत्संग आयोजित करणारे आयोजक आणि उल्हासनगर-३ येथे मध्यवर्ती रुग्णालयाशेजारी ध्वनिक्षेपक लावत फटाके फोडणाऱ्या भारतीय वाल्मिक नवयुवक संघाच्या उपाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर शहरात गणेशोत्सव काळात तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नियम डावलून ध्वनिप्रदूषण करण्यात आले. या प्रकरणी शहरातील हरियाली या संघटनेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यामुळे परिमंडळ-४ चा पोलीस विभाग वादात सापडला होता. मात्र या गोष्टीपासून धडा घेत आता पोलिसांनी प्रदूषणाचे नियम डावलणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

यादरम्यान २८ सप्टेंबर रोजी उल्हासनगर-४ येथील गुरूसिंग सभा गुरूद्वारा येथे पहाटे चार ते सहा या काळात बेकायदेशीरपणे ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याप्रकरणी तरून जयसिंघांनी यांच्याविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिक महाराज जयंतीनिमित्त उल्हासनगर तीनच्या मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर मनाईआदेश असतानाही ध्वनिक्षेपक लावून फटाक्यांची आतषबाजी केल्याप्रकरणी अखिल भारतीय नवयुवक संघाचे उपाध्यक्ष राधाचरण करोतीया यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या मुद्दय़ावरून तोंड पोळलेल्या पोलिसांनी आता ध्वनिप्रदूषणाच्या प्रत्येक घटनेबाबत गुन्हा दाखल करत खबरदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काही काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांनी कायद्याचे पालन करतच सण उत्सव साजरे करावेत, असा इशाराच पोलिसांनी या कृतीद्वारे दिला आहे.

सिंधी, शिख धर्मियांचे ४० दिवस सत्संग

उल्हासनगर शहरात सिंधी आणि शिख धर्मियांच्या मोठय़ा सणांची सुरुवात झाली आहे. या काळात ४० दिवसांपर्यंत अखंड सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात हे कार्यक्रम पहाटे लवकर सुरू होत असतात. त्यामुळेच हरियाली संघटनेतर्फे न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र आता पुढील उत्सवांचे स्वरूप पुढे कसे राहते आणि या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर पोलीस काय कारवाई करतात, याशिवाय सणांच्या काळात नियमन करताना पोलीस काय भूमिका घेतात हे याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

First Published on October 7, 2017 3:52 am

Web Title: diwali 2017 noise pollution