17 December 2017

News Flash

निसर्गाच्या लहरीपणाचा कारागिरांना फटका

गणेशोत्सव संपल्यानंतर वसईत मातीच्या पणत्या बनवण्याच्या कामाला वेग येतो.

वैष्णवी राऊत, वसई | Updated: October 13, 2017 1:57 AM

पणत्या सुकवण्यासाठी पुरेसे ऊन नसल्याने नुकसान

ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी यंदा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. कधी ऊन, तर कधी पाऊस अशा या वातावरणाच्या खेळाचा फटका वसई परिसरातील पणत्या बनवणाऱ्या कारागिरांना बसला आहे. मातीच्या पणत्या सुकवण्यासाठी पूरक ऊन नसल्याने कारागिरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. परिणामी, यंदा वसई मातीच्या पणत्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.

गणेशोत्सव संपल्यानंतर वसईत मातीच्या पणत्या बनवण्याच्या कामाला वेग येतो. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या उन्हात वाळवून भट्टीमध्ये टाकल्या जातात, परंतु यंदा पाऊस सुरूच असल्याने पणत्या बनवण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. वसईतील प्रजापती कुटुंबीय गेल्या ४५ वर्षांपासून हा व्यवसाय करत असून दिवसभर मातीला आकार देत विविध वस्तू त्या तयार करतात. त्यांची पत्नी लक्ष्मी, सून उज्ज्वला आणि नातवंडे हेदेखील यामध्ये हातभार लावतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. दरवर्षी दिवाळीत हे कुटुंबीय ४० ते ५० हजार पणत्या बनवते. मात्र यंदा केवळ पाच हजारच पणत्या बनवून झाल्या असल्याचे करसन प्रजापती यांनी सांगितले. ‘यंदा पावसाचा लहरीपणा सुरू असल्याने पणत्या वळण्यासाठी पूरक असे ऊन मिळाले नाही. अचानक पाऊस आल्यास वाळवत ठेवलेल्या पणत्या भिजल्याने त्या पुन्हा उन्हात वाळवण्यासाठी ठेवाव्या लागतात, तसेच यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरातही पाणी साचले होते आणि आताही पाऊस सुरू असल्याने यंदा आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे,’ असे प्रजापती यांनी सांगितले.

खर्च परवडेनासा

वसईतील पणत्या कारागीर पणत्या बनवण्यासाठी गुजरातहून माती आणतात. ही माती २५० रुपये किलो एक गोण असल्याने व्यवसाय न झाल्यास हा खर्चही या कुंभारांना परवडत नाही, तसेच पणत्या या होलसेलमध्ये विकल्यास प्रत्येकी १ रुपया एक पणती अशा भावाने विकल्या जातात. त्याच पणत्या बाजारात तीन रुपये प्रत्येकी नग विकल्या जात असल्याचे प्रजापती यांनी सांगितले.

First Published on October 13, 2017 1:57 am

Web Title: diwali 2017 problems in making in diwali diya