आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी पहाट
ठाणे : आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या विद्यार्थ्यांनी भिवंडी येथील आनगाव येथील भगिनी निवेदिता बालकाश्रमात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आदिवासी विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध आदिवासी भागांत गेली २० वर्षे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी आनगावमध्ये हा उपक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालयातील १०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. आपल्या घरात बनविलेला फराळ आणि आवाजविरहित फटाके घेऊन हे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे, डॉ. भोर, डॉ. नमिता ढवळ, आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील आणि गावातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. त्यांनी येथील विद्याíथनी आणि ज्येष्ठ नागरिकांसमवेत दिवाळी सण साजरा केला. यावेळी विद्याíथनींना भेटवस्तू देण्यात आल्या.

अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आदिवासी, दुर्गम परिसरात दिवाळी
दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव! आपल्या आजुबाजूचा अंधार दूर करून परिसर प्रकाशमान करावा, असा संदेश दिवाळीचा उत्सव देत असतो. याच संदेशाचा अवलंब करत ठाणे जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सामाजिक भान राखले आहे. जिथे सामाजिक अंधार आहे, असे आदिवासी पाडे, अनाथाश्रम, वंचित मुले, महिला, दुर्गम भाग आदी ठिकाणी अनेक महाविद्यालयीन तरुणांनी तिथे दिवाळीचा आनंद साजरा केला.

अनाथ मुलांसोबत दिवाळी सणाचा आनंद
ठाणे : दिवाळीचा सण म्हणजे सगळ्यांसाठी उत्साहाचे वातावरण असते. मात्र यंदा महाविद्यालयीन तरुणांनी केवळ स्वत:पुरता दिवाळी सण साजरा न करता सामाजिक भान राखत दिवाळी साजरी केली. हरणे अभियांत्रिकी महाविद्यालय, आर. जे. ठाकूर महाविद्यालय आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.
ठाण्यातील येऊर परिसरातील स्वामी विवेकानंद अनाथाश्रमाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. भाऊबीजच्या दिवशी या अनाथाश्रमातील लहान मुलांसोबत महाविद्यालयीन तरुणांनी दिवाळी साजरी केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील फराळ आणून लहान मुलांना फराळाचे वाटप केले, तसेच काही महाविद्यालयीन तरुणांनी आपल्या पॉकेटमनीतील पैशांमधून येथील मुलांसाठी शालेय साहित्याची खरेदी केली.
येऊरमधील भेंडीवाडा या दुर्गम पाडय़ातील आदिवासी लोकांसोबत महाविद्यालयीन तरुणांनी आपल्या दिवाळीच्या सुटीचा आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील काही जुने कपडे आदिवासी पाडय़ात राहणाऱ्या मुलांना दिले. दर्शन पोस्ती, विशाल बोराडे, अबु सैय्यद या तरुणांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महिला वर्ग या उपक्रमात सहभागी झाला होता. तसेच दर्शन पोस्ती या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वेक अप इंडिया संस्थेचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.

‘आईला साडी आणि मुलांना मिठाई’
मॉडेल महाविद्यालयाचा उपक्रम
डोंबिवली : दिवाळी व बालदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील मॉडेल महाविद्यालयाने ‘आईला साडी आणि मुलांना मिठाई’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमानुसार वंचित महिलांना साडय़ा आणि मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने आपण घर सजवत असतो, त्याचप्रमाणे गेल्या सहा वर्षांपासून या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकात रांगोळ्या काढून स्थानकाची सजावट करतात.
या विद्यार्थ्यांनी स्थानकातील तीन वेगवेगळ्या भागात दिवाळीच्या रांगोळ्या रेखाटल्या होता.
‘आईला साडी आणि मुलांना मिठाई’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या घरातील वापरलेल्या परंतु सुस्थितीमध्ये असलेल्या साडय़ा जमा केल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींनीही या उपक्रमास हातभार लावला आणि सुमारे ४०० हून अधिक साडय़ा एकत्र करण्यात आल्या. त्याचबरोबर प्रत्येक घरातून मिठाई आणि फराळाचे संकलन करण्यात आले होते. याशिवाय १४ नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील संतोषी माता चौक परिसरातील गरीब वस्तीमध्ये वाटण्यात आल्या.