दिवाळीनिमित्त महत्त्वाच्या ठिकाणी दिव्यांची आरास

दिवाळीनिमित्त मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, मरीन लाइन्स आदी ठिकाणी नेत्रदीपक रोषणाई करून शहर सौंदर्यात भर घातली जाते. त्याच धर्तीवर गेल्या वर्षीपासून ठाणे शहरातही दिव्यांची आरास केली जाते. यंदाही शहरातील प्रवेशद्वारे, महत्त्वाचे चौक, वास्तू दिव्यांची उजळून निघाले आहेत. अलीकडेच महापालिकेने ‘ब्रॅण्ड ठाणे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. दिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या रोषणाईने या प्रकल्पाची चुणूक ठाणेकरांना पाहायला मिळत आहे.

मुंबईतील सी.एस.टी, मरीन ड्राइव्ह तसेच अन्य महत्त्वाच्या वास्तूंवर दिवाळीनिमित्ताने विद्युत रोषणाई केली जाते. त्याच धर्तीवर महापालिकेने संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई करण्याचा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे. यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला आल्याने रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईमुळे शहराला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ही रोषणाई करण्यात येते. महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग समिती कार्यालये, गडकरी रंगायतन, शहरातील मुख्य प्रवेशद्वार तसेच अन्य महत्त्वाच्या वास्तूंवर महापालिकेने विद्युत रोषणाई केली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर चेकनाक्यापासून ते घोडबंदपर्यंतच्या मार्गावर एमसीएचआय संस्थेने विद्युत रोषणाई केली आहे. तसेच महामार्गालगत असलेल्या झाडांवरही विद्युत माळा सोडण्यात आल्या असून त्यामुळे झाडांना विविध रंगांची झळाळी प्राप्त झाली आहे. प्रवेशद्वार ओलांडून ठाण्यात प्रवेश करणाऱ्याला ही रोषणाई आकर्षित करीत आहे. याशिवाय, ठाणे शहरातील आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या मासुंदा आणि उपवन तलाव परिसरातही विद्युत रोषणाई करण्यात आली असून तलाव रंगीबेरंगी झाला आहे.