विद्युत रोषणाई आणि पाश्चात्त्य खाद्यपदार्थाचे आकर्षण

तलावपाळी, राममारुती रोड या दरवर्षीच्या ठिकाणी ठाणेकर दिवाळी साजरी करत असतानाच मुख्य शहराबाहेर वसलेल्या भागांतही दिवाळीचा अमाप उत्साह आणि जल्लोष दिसून आला. हिरानंदानी मेडोज, उपवन, हिरानंदानी वॉक, घाणेकर नाटय़गृह परिसर, कोपरी पूर्व आणि वसंतविहार या भागांत दिवाळीनिमित्त करण्यात आलेली रोषणाई, खाद्यपदार्थाची रेलचेल आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जुन्या ठाण्यातूनही तरुण मंडळी या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याचे यंदा दिसून आले.

दिवाळी पहाटच्या निमित्ताने नागरिक, तरुण-तरुणी ठाण्यातील नौपाडा परिसर, गोखले मार्ग आणि मासुंदा तलाव परिसरात एकत्र येऊन वर्षांनुवर्षांची परंपरा जपतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरुण-तरुणींचे घोळके हमखास तलावपाळी, उपवनजवळ जमत असले तरी सायंकाळी सणांची रोषणाई अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ठाणेकर नव्याने वसलेल्या गृहसंकुलांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. उपवन तलाव परिसर, हिरानंदानी मेडोज, हिरानंदानी वॉक, लोढा, घाणेकर नाटय़गृह परिसर, पाचपाखाडी आणि वसंतविहार यासारख्या भागात जास्त लोकवस्ती असणाऱ्या मोठय़ा गृहसंकुलांच्या परिसरात नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही नागरिक फटाके वाजवण्याकारिता या भागात रात्रीच्या वेळेस येत असल्याचेही पाहायला मिळाले.

कार्यालयातून लवकर येऊन रात्रीच्या वेळेस दिवाळीसाठी हिरानंदानी मेडोज भागात एकत्र जमत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आले. ठाण्यातील रस्त्यांवर होणाऱ्या नेहमीच्याच वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी यंदाच्या वर्षी गृहसंकुलातील नागरिकांनी गृहसंकुलातच सामूहिकरीत्या दिवाळी साजरी केल्याचे दिसून आले आहे. उपवन, लोकपुरम, वसंतविहार या भागातील विविध गृहसंकुलांमध्ये दिवाळीनिमित्त संगीत खुर्ची, दमशेराज यासारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. काही संकुलांमध्ये सामूहिक फराळ कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, दिवाळीचे है चैतन्य त्यात्या वसाहतींमधील रहिवाशांपुरते मर्यादित न राहता ठाण्यातील विविध भागांमधील रहिवाशी ही नवलाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले.

आकर्षक रोषणाई

हिरानंदानी वॉक, हिरानंदानी मेडोल्ज, उपवन, राममारुती रोड या परिसरात मोठय़ा प्रमाणावर खास दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घोडबंदर येथील काही मोठय़ा गगनचुंबी इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे  विलोभनीय दिसणाऱ्या या इमारती पाहण्यासाठी नागरिक या परिसरातील रोषणाई पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने एकत्र येत आहेत.

पूर्वी दिवाळी पहाटला मासुंदा तलाव येथेच आम्ही मित्र-मैत्रिणी भेटायचो. आता मात्र घोडबंदरमधील नव्या ठिकाणांवर भेटणे आणि दिवाळीचा आनंद घेणे हे नित्याचे होऊ लागले आहे. रुंद रस्ते, खाद्यपदार्थाची चंगळ, संगीत-रोषणाईची नवलाईमुळे एकत्र येणे, सेल्फी काढण्याची मजा काही औरच असते.

– नचिकेत सासणे, ठाणेकर तरुण.