कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील नेहमीची गर्दी ओसरली; फटाके न फोडता स्वागत
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी शहरातील ठरावीक ठिकाणी जमण्याची परंपरा काही शहरांना वर्षांनुवर्षांपासून लाभलेली आहे. यामध्ये ठाणे, डोंबिवलीपाठोपाठ कल्याण शहराचाही क्रमांक लागतो. परंतु वर्षांनुवर्ष चालत आलेली परंपरा कल्याण शहरात कमी होऊ लागली असल्याचे चित्र दिसून आले आहे.
कल्याणातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील तरुण मंडळी जमतात. दिवाळीच्या निमित्ताने शाळेतील माजी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी असे नागरिकांचे विविध समूह या ठिकाणी येत असतात. भेटीगाठींबरोबरच किल्ल्यावरील देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतले जाते. वर्षभर ओस पडणारा हा किल्ला दिवाळीच्या दिवसात मात्र माणसांच्या गर्दीत न्हाऊन निघतो. परंतु यंदाच्या दिवाळीत मात्र चित्र काहीसे वेगळे होते.
दुर्गाडी किल्ल्यावर मंगळवारी लोकांची फारशी गर्दी नव्हती. फटाके न फोडता दिवाळीचे स्वागत करण्यात आले खरे, मात्र तरुणाईचा हा जल्लोष कुठे गेला असे म्हणत शहरातील दिवाळीचा उत्साह मावळल्याचे चित्रही पाहायला मिळाले.