05 December 2020

News Flash

संकटातही करंजा, लाडू, चकल्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास

दिवाळी फराळ ठाणे जिल्ह्य़ातून अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलियाला

दिवाळी फराळ ठाणे जिल्ह्य़ातून अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलियाला

डोंबिवली : करोना महामारीची साथ सुरू असल्याने उत्सवी स्वरूपात दिवाळी सण या वेळी साजरा करता येणार नसला तरी विदेशात राहात असलेल्या आपल्या आप्त, स्वकीय नातेवाईकांना घरबसल्या का होईना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या विचारातून ठाणे जिल्ह्य़ातील विविध भागांतील रहिवाशांनी आपल्या विदेशातील नातेवाईकांना खासगी वाहतूक व्यवस्थेतून दिवाळीचा फराळ पाठवून दिला आहे.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ठाणे, डोंबिवली परिसरांतील नागरिक खासगी टपाल, वस्तू वितरण संस्थांच्या माध्यमातून दिवाळीचा फराळ विदेशात राहात असलेल्या नातेवाईक, शिक्षण घेत असलेल्या मुलांना पाठवत असतात. या वेळी महामारीची साथ सुरू असल्याने फराळ पाठविता येईल की नाही, फराळ पाठविण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध होईल की नाही, अशा अनेक शंका रहिवाशांमध्ये होत्या.

जूनपासून टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हवाई वाहतूक काही प्रमाणांत सुरू झाली आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी फराळ तयार करणाऱ्या दुकानदारांनी ग्राहकांची मागणी पाहून त्याप्रमाणे करंज्या, चकल्या, रवा, बेसन, बुंदी लाडू, अनारसे, शंकरपाळ्या, चिवडा आणि इतर मिठाईजन्य पदार्थ तयार केले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागांत काही महिला संस्था फराळाचे साहित्य तयार करतात. त्यांनाही यापूर्वीसारखा नाही पण काही प्रमाणात ग्राहकांचा फराळ खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला आहे. ‘मिठाई पदार्थ विक्रीबरोबर दिवाळी सणापूर्वी आम्ही फराळाचे सर्व साहित्य बनवितो.

विदेशात पाठविण्याचीही आम्ही सोय करतो. परंतु विदेशात पाठविण्यासाठी आम्ही घाऊक पद्धतीने फराळाचे साहित्य विक्री करीत नाही. फराळाचे साहित्य विदेशात पाठविण्याचे अन्न आणि प्रशासन विभागाचे नियम कठोर आहेत. एखाद्या ग्राहकाकडून झालेली लहानशी चूकही विक्रेते म्हणून अनेक वेळा महाग पडू शकते,’ असे डोंबिवलीतील कुळकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुळकर्णी यांनी सांगितले.

विदेशातील नातेवाईक, शिक्षण घेणाऱ्या मुलांना स्थानिक रहिवासी विविध वस्तू वर्षभर पाठवीत असतात. दिवाळी सणापूर्वी दोन महिने अगोदरच रहिवासी फराळ पाठविण्यास सुरुवात करतात. त्याप्रमाणे आम्ही रहिवाशांनी तयार केलेला फराळ जमा करून तो कार्यालयात आणून पाठविण्याची व्यवस्था करतो.

फराळामध्ये सुका मेवा, दिवाळी फराळाचे सर्व साहित्य असते. महामारीचा काळ असला तरी ग्राहकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे, असे अश्वमेध कुरिअर सेवेचे संचालक केदार नवरे यांनी सांगितले.

फराळ पाठविणारे ५०० हून अधिक ग्राहक

महामारीमुळे टाळेबंदीत शिथिलता मिळते की नाही, हवाई वाहतूक सुरू होते की नाही, यावेळी दिवाळी फराळ रहिवाशांना विदेशात पाठविता येईल की नाही, अशा अनेक शंका होत्या. जूनपासून टाळेबंदीत शिथिलता मिळत गेली. बहुतांशी व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांनी जूनपासून विदेशातील आपल्या नातेवाईकांना दिवाळी फराळ पाठविण्याची तयारी केली. आतापर्यंत ५०० किलो फराळ सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, कतार या देशांत पाठविण्यात आला आहे. फराळ पाठविणारे सुमारे ५००हून अधिक ग्राहक ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, कर्जत परिसरांतील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 2:24 am

Web Title: diwali faral from thane district export to usa singapore canada australia zws 70
टॅग Diwali
Next Stories
1 आठ महिन्यांनी तरुणाचा शोध
2 शहरबात : ग्रामीण ठाण्याचे आरोग्य सक्षमीकरण कधी?
3 पोलिसांच्या शोधमोहिमेत ‘एका शब्दा’चा आधार
Just Now!
X