|| पूर्वा साडविलकर

गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रयोग; बच्चेकंपनीचा चांगला प्रतिसाद :- दिवाळीच्या सुट्टीतील बच्चेकंपनीसाठीची आणखी एक गंमत म्हणजे बालनाटय़. उन्हाळी किंवा दिवाळी सुट्टय़ांचे निमित्त साधून या कालावधीत अनेक बालनाटय़े सादर होत असतात. मात्र, मोबाइल-टीव्हीच्या प्रेमात बुडालेल्या बच्चेकंपनीकडून त्याला प्रतिसाद कमीच मिळतो. हेच निराशादायक चित्र यंदा काहीसे पालटले आहे. या वर्षीच्या दिवाळीच्या सुट्टीत ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील नाटय़गृहांत बालनाटय़ांचे अधिक प्रयोग झाले असून त्यांना रसिक बालप्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यंदा दिसून येत आहे.

मोबाइल गेम, व्हिडीओ गेम किंवा टीव्हीच्या पाशात गुरफटलेल्या बालमंडळींना रंगभूमीच्या मंचावरची न्यारी दुनिया दाखवण्यासाठी दर वर्षी नवनवीन बालनाटय़े सादर होत असतात. लहान मुलांमधील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच नाटय़रसिकांचा वारसा जपणारी पिढी तयार करण्याचेही प्रयत्न आयोजक, निर्मात्यांचे असतात. त्यामुळे यावर्षी २९ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबपर्यंतच्या दिवाळीच्या सुट्टीत ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील नाटय़गृहांमधील बहुतेक तारखा बालनाटय़ सादरकर्त्यांनी पटकावल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, डोंबिवलीतील सावित्रीबाई नाटय़गृह आणि कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या नाटय़गृहात बालनाटय़ाचे सादरिकरण होत आहे. राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबपर्यंत ७ बालनाटय़, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाटत ६ बालनाटय़ आणि सावित्रीबाई फुले नाटय़गृहात २ तर, आचार्य अत्रे रंगमंदिरमध्ये ३ बालनाटय़ाचे प्रयोग सादर झाले आहेत. तर, ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतनात ६, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ३, सावित्रीबाई फुले नाटय़गृहात २ आणि आचार्य अत्रे रंगमंदिरमध्ये ५ बालनाटय़ांचे प्रयोग सादर होणार आहेत.

‘बालनाटय़ांना आणखी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. यासाठी बालनाटय़ांचे प्रयोग केवळ मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्यास प्राधान्य देण्याऐवजी दर शनिवारी किंवा रविवारी बालनाटय़ाचे प्रयोग व्हायला हवेत. जेणेकरून बालनाटय़ांची आवड रसिकांमध्ये अधिक वाढीस लागेल,’ असे बालनाटय़ दिग्दर्शक केदार सुपारकर याने सांगितले.

गाजत असलेली बालनाटय़े

‘कापूस कोंडय़ाची गोष्ट’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’, ‘एका माकडाने काढलयं दुकान’, ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’, ‘फुलपाखरू आणि सैतान’, ‘हरवलेल्या गोष्टींचे नाटक’, ‘फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर’, ‘धम्माल भूतबंगला’, ‘मोबाइल गेम्स चॅम्पियन्स’, ‘भीमचा वाढदिवस’, ‘वाघोबाचं नाटक’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘९सम्राट’, ‘जंगलबुक’, ‘फन्नी राजकन्या’, ‘माकडाची शाळा’, ‘राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान’, ‘नवे गोकुळ’.

दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बालनाटय़ाचे प्रयोग सादर करणे गरजेचे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बालनाटय़ प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. – विजय जोशी, नाटय़गृह व्यवस्थापक, ठाणे महापालिका.

सुट्टीच्या दिवसांत बालनाटय़ांचे प्रयोग होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतू, हे प्रयोग व्यवसायापुरते मर्यादित राहू नयेत, तर या माध्यमातून लहान मुलांना उत्तम संदेशही द्यायला हवेत. – डॉ. अरुंधती भालेराव, संचालिका, प्रारंभ कला संस्था, ठाणे