|| पूर्वा साडविलकर

खारकेपाठोपाठ बदाम, पिस्त्याच्याही दरांत वाढ

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फटका सुक्या मेव्यावर होऊ लागला आहे. पाकिस्तानातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू, पदार्थावर र्निबध आल्यामुळे भारतीय बाजारात बदाम, पिस्ता आणि खारीक या जिन्नसांची आवक घटली असून दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात बदाम, पिस्त्याच्या दरात प्रति किलो १०० रुपयांनी वाढ झाली असून खारकेच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना सुक्या मेव्याच्या या महागाईला सामोरे जावे लागणार आहे.

दिवाळीनिमित्त घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या फराळामध्ये तसेच बाजारातील मिठाईमध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, पिस्ता, किसमिस आणि खारकेचा वापर केला जातो. तसेच अनेक जण सुका मेवा हा आप्तेष्टांना भेट म्हणून देतात. मात्र यंदा सुका मेवा खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सुक्या मेव्यातील बदाम, पिस्ता आणि खारीक या पदार्थाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बदामाची विक्री महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात प्रति किलो ६३० रुपयाने आणि किरकोळ बाजारात ८०० रुपयाने होत होती. सध्या बदामाची विक्री घाऊक बाजारात प्रति किलो ७०० रुपयाने आणि किरकोळ बाजारात ९०० रुपयाने होत आहे. पिस्त्याची विक्री जून महिन्याच्या अखेरीस घाऊक बाजारात प्रति किलो १५०० रुपयाने आणि किरकोळ बाजारात १७०० रुपयाने होत होती. यामध्ये वाढ झाली असून पिस्त्याची विक्री घाऊक बाजारात प्रति किलो १६०० रुपयाने आणि किरकोळ बाजारात १८०० रुपयाने होत आहे. खारकेची विक्री ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस घाऊक बाजारात १८० रुपयाने आणि किरकोळ बाजारात २०० रुपयाने होत होती. मात्र उत्तम प्रतीचा खारीक घाऊक बाजारात २५० रुपयाने आणि किरकोळ बाजारात ४०० रुपयाने मिळत आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत बदाम, पिस्ता आणि खारकेच्या दरात वाढ झाल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

ऐन दिवाळीत सुका मेव्याचे भाव वाढल्यामुळे सुका मेवा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाला आहे. बदाम, पिस्ता आणि खारकेच्या पुरवठय़ात २० टक्क्यांनी घट झाल्याने यांच्या किमतीत वाढ झाली आहे. या किमतींमध्ये काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. – नारायण चौधरी,सुका मेवा विक्रेते.