दोन दिवस गर्दीची शक्यता असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना

ठाणे : दिवाळीचा सण पुढील आठवड्यात येऊन ठेपला असताना ठाणे शहरातील बाजारपेठा करोनाकाळातही सज्ज झाल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. गणेशोत्सव तसेच दसऱ्याच्या निमित्ताने या बाजारांमध्ये काही प्रमाणात गर्दी झाली होती. दिवाळीनिमित्त नागरिक खरेदीसाठी नेहमीच्या उत्साहाने बाहेर पडतील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.

बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी स्वतंत्र नियोजन केले असून पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्यामळे शहरातील करोनाचा संसर्ग ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात घटला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी आणि नागरिकांच्या गृहभेटी यांमुळे सप्टेंबर महिन्यात शहरातील संसर्गाचे प्रमाण वाढले होते. पुढील आठवड्यात दिवाळीचा सण येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे शहरात पुन्हा करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन कंबर कसली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाका व ठाणे स्थानक परिसरात कोंडी होण्याची शक्यता असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन आखले आहे. ठाणे नगर पोलिसांनीही गर्दी टाळण्यासाठी नियोजन केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एम. सोमवंशी यांनी सांगितले.

मुखपट्टी नाही तर  प्रवेश नाही

दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने दुकांनामध्ये खरेदीसाठी गर्दी होणार असली तरी या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पसरू नये याची दक्षता शहरातील व्यापारी घेत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सर्वच व्यापाऱ्यांनी मुखपट्टीचा वापर करणे अनिवार्य केले आहे. ग्राहकांकडे मुखपट्टी नसल्यास दुकानांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती ठाणे व्यापारोद्योग महासंघाचे भावेश मारू यांनी दिली. शहरातील सर्व दुकानांमध्ये सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य केला असून  अंतरसोवळ्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणार असल्याचेही मारू यांनी सांगितले.

नियोजन काय?

  • शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये अतिरिक्त २५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
  • गर्दी टाळण्यासाठी पोलिसांतर्फे ध्वनिक्षेपकाचा वापर करून सूचनाही दिल्या जाणार आहेत.
  •  वाहनांचा भार वाढल्यास जांभळी नाका ते ठाणे स्थानक हा रस्ता वाहनांसाठी मार्गरोधक लावून बंद केला जाणार असल्याचे ठाणे वाहतूक शाखेतर्फे सांगण्यात आले.
  •  या काळात बाजारपेठांमध्ये होणारी बेशिस्त पार्किंग टाळण्यासाठी वाहतूक पोलीस स्वतंत्र नियोजन आखत आहेत.