परंपरेला आधुनिकतेचा साज

मुंबईत राहणे परवडण्यापलीकडे झाल्याने मराठी माणूस ठाणे, डोंबिवलीच्या दिशेला कूच करू लागला. त्यामुळे मराठमोळ्या सणसोहळ्यांचे केंद्रही या शहरांकडे सरकत गेले. या शहरांनी दिवाळीचे पारंपरिक स्वरूप आजही राखले आहे. मात्र, त्याचबरोबर या शहरांतील तरुणाई या पारंपरिकतेला आधुनिकतेची जोडही देऊन नव्या प्रथा रूढ करत आहे. दिवाळीच्या पहाटे डोंबिवलीच्या फडके रोडवर होणारी तरुण-तरुणींची गर्दी याचेच प्रतीक आहे.

देश आणि परदेशांतही मोठय़ा उत्साहात साजरी केली जाणारी दिवाळी प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. प्रत्येक ठिकाणी त्यामध्ये नावीन्य आढळून येत असले तरी काही परंपरा मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळ्या असतात. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये ही दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. पारंपरिक दिवाळी साजरी करत असताना त्यामध्ये आधुनिक संकल्पनांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रत्येक शहराची दिवाळी वेगळी बनली आहे.
ठाण्यातील राम मारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी परिसर या ठिकाणी साजरी केली जाणारी दिवाळी आणि डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील तरुणाईकडून साजरी केली जाणारी दिवाळी या सगळ्याचा एक वेगळा ठसा ठाणे जिल्ह्य़ात निर्माण झाला आहे. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसर आणि काळातलाव परिसरातही तरुणाई दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र येऊ लागली आहे. शिवाय येथील उत्साहही वर्षांगणिक वाढत जात आहे. दिवाळी पहाटेला गाण्यांच्या कार्यक्रमांची मैफील आयोजित करून संगीताचा आनंद साजरा करण्याची संकल्पनाही ठाण्यात ३० वर्षांपूर्वीपासून जपली जात आहे. तर दिवाळी साजरी करताना त्यातून सामाजिक भान राखण्याचे विविध उपक्रमही येथेच पाहायला मिळतात. पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी दिवाळी येथील तरुणांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरी करून एक वेगळा आयाम येथील दिवाळीला प्राप्त करून दिला आहे.
नरकचतुर्थीच्या दिवशी अभ्यंगस्नानाने दिवाळी साजरी करून कुटुंबासह फराळ खाण्याकडे नागरिकांचा कल असला तरी हा फराळ खाण्यापूर्वी मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा प्रघात डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर सुरू झाला. गेली पंधरा ते वीस वर्षांमध्ये या रस्त्यावरील ही परंपरा म्हणजे डोंबिवलीचे एक वैशिष्टय़ निर्माण झाले आहे. या संकल्पनेतील चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन विविध शहरांनी या संकल्पनेचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्यातूनच ठाण्यातील तलावपाळी, राम-मारुती रोड, गोखले रोड आणि उपवन परिसरातही नागरिकांनी एकत्र येऊन शुभेच्छा देण्याची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे दिवाळीच्या पहाटे या रस्त्यांवर अवतरणाऱ्या या तरुणाईला कोणीही निमंत्रण देत नाही, कोणी या कार्यक्रमाचे आयोजन करत नाही तरीही केवळ शुभेच्छा देण्यासाठी तरुणाईचा मोठा समुदाय या रस्त्यावरून प्रवाहित होत असतो. तरुणाईचा प्रतिसाद या उपक्रमाला सर्वाधिक असून त्या निमित्ताने वर्षांतून एकदा भेटणाऱ्या मित्रांची भेटही येथील रस्त्यांवर होते. डोंबिवली, ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही अशा उपक्रमांची सुरुवात झाली असून टिळक चौक, पारनाका परिसर, दुर्गाडी किल्ला, काळा तलाव आणि गणेशघाट या भागांमध्येही तरुणाईने नव्याने दिवाळी साजरी करण्याची ठिकाणे तयार केली आहे. दिवाळीचा हा वेगळा प्रकार याच भागात पहायला मिळतो.
सांस्कृतिक कार्यक्रमांची
दिवाळी पहाट..
दिवाळी पहाट ही संकल्पनासुद्धा ठाणे, डोंबिवली या भागांतून निर्माण झाल्याचा दावा येथील सांस्कृतिक क्षेत्रातून केला जातो. दिवाळीची पहाट संगीतमय व्हावी या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारच्या कला असलेले कलाकार एकत्र येऊन कलेचे सादरीकरण घरगुती स्वरूपात करत होते. मात्र कालांतराने ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम सगळीकडे सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्याची सुरुवात झाली. शहरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमांची संख्या लक्षणीय वाढली असून गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, सावित्रीबाई फुले नाटय़गृह आणि अत्रे रंगायतनसारख्या नाटय़गृहांमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते. मोकळी मैदाने, विविध कट्टे आणि शहरातील चौकाचौकांमध्ये सुद्धा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागला आहे.
ठाण्यातील कलाकारांची दिवाळी..
मराठी-हिंदी चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ठाणेकर कलाकारांच्या संस्थेच्यावतीने दरवर्षी गडकरी रंगायतनच्या प्रांगणात दिवाळी साजरी केली जाते. संतोष जुवेकर, मंगेश देसाई, पूर्णिमा केंडे, अभिजीत केंडे, विजु माने, नयन जाधव यांच्यासारख्या ४० हून अधिक कलाकारांच्या संस्थेच्या वतीने दिवाळी साजरी केली जाते. रांगोळ्यांचे सडे, आकाश कंदिलांची सजावट आणि आवाज विरहीत फटाक्यांसह गडकरीच्या प्रांगणात हे कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय दिवाळी साजरी करत असतात. ही दिवाळी पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते.
सोसायटय़ांमधील दिवाळी..
दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याचा सण असला तरी शहरातील बंद दरवाज्याच्या संस्कृतीमध्ये दिवाळी केवळ कुटुंबापुरती मर्यादित बनली होती. हे टाळण्यासाठी ठाण्यामध्ये सोसायटय़ांची दिवाळी साजरी करण्याची एक नवी संकल्पना पुढे येऊ लागली असून नवे ठाणे म्हणून ओळख निर्माण केलेल्या घोडबंदर परिसरामध्ये गृहसंकुलांच्या वतीने एकत्रित दिवाळी साजरी करण्यात येते. रहेजा गार्डन, अमाल्फी आणि इस्कोना सोसायटी, सनक्रेस्ट सोसायटी, कशीश पार्क, ब्रम्हांड अशा ठाण्यातील सोसायटय़ांमध्ये एकत्रित दिवाळी साजरी केला जात आहे. एकाच परिसरात आणि एकाच इमारतीमध्ये राहणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी ही नवी संकल्पना आता राबवली जात असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद ठाण्यातील या नव्या परंपरेच्या दिवाळीला मिळू लागला आहे.
सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न..
दिवाळी साजरी करताना त्यातून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न ठाण्यातील विविध संस्थांच्या वतीने करण्यात येतो. यामध्ये वंचितांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहचवण्याचा उपक्रम, वनवासी बांधवांपर्यंत स्वेटर, कपडे आणि फराळ पोहचवण्याचा प्रयत्न ही ठाण्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून केला जातो. तर ईशान्य भारतातून शिक्षणासाठी ठाणे, मुंबई आणि डोंबिवलीसारख्या भागामध्ये शिक्षणाला आलेल्या विद्यार्थ्यांना फराळाचे आमंत्रण देऊन त्यांना घरी बोलवून सांस्कृतिक आदानप्रदानाचा प्रयत्नही केला जातो.
पर्यावरण स्नेही दिवाळीचा प्रयत्न..
पर्यावरण स्नेही दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न ठाण्यात मोठय़ाप्रमाणात होऊ लागले असून पर्यावरण दक्षता मंच, चिल्ड्रन टेक सेंटर सारख्या संस्था दिवाळीतील विजेचा अपव्य टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे आकाश कंदील बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. तर डॉ. महेश बेडेकर आणि सामाजिक कार्य करणारे ठाणेकर दिवाळीनिमित्ताने होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजवण्याविषयी जनजागृती करत आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागृती व्हावी यासाठी फटाके न वाजवता पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला जात आहे.