पदपथांवरील अतिक्रमणाला राजकीय नेत्यांची साथ?

ठाण्यातील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केल्याचा देखावा करणाऱ्या ठाणे महापालिकेने दिवाळीच्या तोंडावर शहरातील बहुतांश पदपथ दुकानदार आणि फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र आहे. गोखले रोड, राममारुती मार्ग, नौपाडा, घंटाळी या भागांतील मुख्य बाजारपेठांच्या रस्त्यांलगतच्या पदपथांवर दुकानदारांनी अतिक्रमण करून दिवाळीचा बाजार मांडला आहे. विशेष म्हणजे, काही राजकीय नेत्यांचे फलक लावून पदपथांवर वस्तू विक्रीचे चक्क मंडप उभारण्यात आल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीपूर्व खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे ठाण्यातील जांभळी नाका, राममारुती रोड, गोखले रोड, घंटाळी परिसर कोंडीमय झाले आहेत. रस्त्यांलगत असलेल्या पदपथांवर रांगोळी, पणत्या, कंदील अशा किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. मात्र, त्यासोबतच बाजारपेठेतील दुकानदारांनीही आता आपले सामान विक्रीसाठी पदपथावर मांडण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकानदारांनी पदपथांवर मंडप उभारून तेथे दुकाने भरवली आहेत. आधीच गर्दीमुळे रस्त्यांवरून चालणे कठीण आणि त्यात पदपथांवरही अतिक्रमण झाल्याने नागरिकांना या बाजारांतून मार्गक्रमण करणेच अशक्य बनले आहे.

राममारुती मार्गावर तर भाजप आमदार संजय केळकर यांचे फलक लावून एका संस्थेने पदपथावर मंडप उभारला आहे. या ठिकाणी दिवाळीतील साहित्याची विक्री केली जात आहे. या मंडपांना कुणी परवानगी दिली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हे स्टॉल पदपथांसह  वाहनतळांच्या जागेतही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी आपली वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने पदपथांवर अनिधकृतपणे सुरू असलेल्या वस्तू विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांना स्टॉल हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अशोक बुरपुल्ले, अतिक्रमण उपायुक्त, ठाणे महापालिका