दिवाळीत परिसरात गर्दी न करण्याचे मंदिर संस्थानचे आवाहन

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

डोंबिवली : अभ्यंगस्नान करून दिवाळीचा पहिला मंगलमय दिवस डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर पहाटे साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदा प्रथमच करोना संसर्गाच्या भीतीने खंडित होणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानचे ग्रामदैवत गणपती मंदिर शासन निर्णयाप्रमाणे मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. दिवाळीच्या दिवशीही ते खुले होणार नसल्याने भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.

डोंबिवलीतील फडके रस्त्यावर कल्याण-डोंबिवली शहरांसह ठाणे, मुंबई, कर्जत, कसारापासून तरुणाई दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी येत असते. फडके रस्त्यासह आजूबाजूचे गल्लीबोळ वाहनांच्या आणि तरुण-तरुणींच्या गर्दीने भरून जातात. वाद्यवृंद, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी दिवाळी पहाटनिमित्त श्री गणेश मंदिर संस्थान, अन्य सामाजिक संस्थांतर्फे फडके रोडवर दिली जाते. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवाळी उत्साहाचा माहोल फडके रोडवर पाहण्यास मिळतो. परंतु यंदा करोनाच्या संसर्गाने मंदिर संस्थानने एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. फडके रोडवर राहणाऱ्या रहिवाशांनी दिवाळीच्या दिवसापुरता या भागात जमावबंदी आदेश पोलिसांनी लागू करावा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक उत्साही तरुण फडके रोडवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मंडप उभारणी

श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे चालू वर्षी आप्पा दातार चौकात मंडप उभारून त्यावर शहरवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारा फलक लावण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात अजिबात गर्दी करू नये, असे आवाहन करणारा फलक गणेश मंदिराजवळ लावण्यात येणार आहे, असे श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले.

पोलिसांकडून रस्तेबंदीचे नियोजन

दिवाळी पहाटनिमित्त शनिवारी फडके रोडवर तरुणांची गर्दी जमण्याची शक्यता असल्याने पोलीस व पालिकेच्या वतीने गर्दी जमू न देण्याचे नियोजन केले जात आहे. फडके रोडची बाजीप्रभू चौक, गणपती मंदिरकडील बाजू बंदिस्त केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आगरकर रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता पहाटे ते दुपापर्यंत वाहनांसाठी बंद करण्याचा विचार सुरू आहे. लोकलमधून प्रवासाला मुभा नसल्याने फडके रोडवर दिवाळी साजरी करण्यासाठी ठाणे, बदलापूर, २७ गाव, पलावा, कल्याण परिसरातील तरुण चारचाकी, दुचाकी घेऊन येण्याची शक्यता असल्याने हे नियोजन केले जात आहे.

वाळीच्या पहिल्या दिवशी गणेश मंदिर परिसरात गर्दी करू नये. करोना संसर्गामुळे यंदा दिवाळी पहाटचा फडके रोडवरील सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही, असे आवाहन श्री गणेश मंदिरतर्फे भाविकांना केले जाणार आहे. गर्दी होणार नाही या दृष्टीने पालिका, पोलिसांनी नियोजन करावे.

– राहुल दामले, अध्यक्ष, गणेश मंदिर संस्थान

फडके रोडवर दिवाळीतहोणारी गर्दी लक्षात घेऊन फडके रोड, मंदिर परिसर, लगतच्या रस्त्यांवर भाविक, तरुणांनी गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेच्या फ प्रभागतर्फे बुधवारपासून फडके रोड परिसरात करण्यात येणार आहे.

– राजेश सावंत, ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी, डोंबिवली