दसरा संपल्यावर आपल्याला वेध लागतात ते दीपावलीचे. प्राचीन वर्षांपासून दरवर्षी हिंदू कार्तिक महिन्यात दीपावली हा पारंपरिक सण साजरा करतात. दिव्यांच्या ओळी असलेली ती दीपावली. अंधारावर मात करणारा, निराशा, आळस दूर करणारा उत्साहाचा सण म्हणजे दीपावली. हा सुगीचा सण म्हणूनसुद्धा साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दीपावली म्हणजे दिवाळीचे मुख्य दिवस साजरे केले जातात.

हे दिवस का साजरे केले जातात यामागेही काही आख्यायिका आहेत. धनत्रयोदशी- हेमा राजाचा पुत्र सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा, राणी त्याने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून त्याचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार असतो म्हणून त्याची पत्नी त्यास गाणी, गोष्टी सांगून त्यास रात्री जागे ठेवते. त्याच्या अवतीभोवती, महालाचे प्रवेशद्वार सोन्याचांदीने भरून ठेवतात. सर्व महालात मोठय़ा दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. यम सर्प रूपात त्याच्या महालात येतो तेव्हा त्याचे डोळे सोन्याचांदीने दिपतात. त्यामुळे यम परत जातो. राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच धनत्रयोदशीला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर दिव्यास नमस्कार करतात. यामुळे अपमृत्यू टळतो असे समजतात. धनत्रयोदशीची अजून एक दंतकथा आहे. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून लक्ष्मी प्रकट झाली, तसेच समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला म्हणून या दिवशी धन्वंतरीचीही पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. या दिवशी धनाची व अवजारांची पूजा करतात.
नरकचतुर्दशी- प्राग्ज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा बलाढय़ असुर राज्य करीत होता. देव व मानव यांना तो फार त्रास देऊ लागला. जिंकून आणलेल्या १६ हजार उपवर राजकन्यांना त्याने तुरुंगात कोंडून ठेवले. त्यांच्याशी तो विवाह करणार होता. जिकडेतिकडे हाहाकार उडाला, म्हणून श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. कृष्णाने तसा वर दिला. म्हणून या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतात. वाईट गोष्टींचा नाश व्हावा म्हणून पायाखाली चिरांटे फोडतात.
लक्ष्मीपूजन- या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. त्यासाठी एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. धने, गूळ, साळीच्या लाहय़ा, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर त्याचा प्रसाद वाटला जातो.
बलिप्रतिपदा- बलिराज हा अत्यंत दानशूर होता, पण त्याने या गुणाचा अतिरेक केला. तो सत्पात्रांबरोबर अपात्रांनाही दान देत असे. त्यामुळे अपात्र मदोन्मत होऊन वाटेल तसे वागू लागले. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा म्हणजे वामनाचा अवतार घेतला व बलिराजाकडे त्रिपाद भूमिदान मागितले, त्याप्रमाणे बलिराजाने ते दान त्याला दिले. वामनाने विराट रूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी, दुसऱ्या पायाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कुठे ठेवू, असे बलिराजास विचारले असता बलिराजाने स्वत:च्या मस्तकावर पाय ठेवण्यास सांगितले. बलिराजाला पाताळात घालावयाचे ठरवून वामनाने त्यास वर मागायला सांगितले. तेव्हा पृथ्वीवरील राज्य संपणार असल्यामुळे तीन पावले टाकली ते तीन दिवस पृथ्वीवर प्रतिवर्षी माझे राज्य म्हणून ओळखले जावे, असा बलिराजाने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. या दिवशी घरातील कचरा काढून ‘इडा पीडा टळो’ म्हणून तो कचरा फेकून दिला जातो. बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात व पती तिला आवडती वस्तू भेट देतो.
भाऊबीज- यमद्वितीया हा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशीचा चंद्र वर्धमानता दाखवितो तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत जावो, ही यामागची भूमिका असल्यामुळे बहीण भावाला ओवाळते व त्याला दीर्घायुष्य व आरोग्य मिळावे, अशी प्रार्थना करते. भाऊ तिला आवडती वस्तू भेट देतो.
लहानपणी दिवाळी जवळ आली की, प्रथम मी आमच्या घरी धुणे, भांडी करायला येणाऱ्या मुलीला माळ्यावरील रांगोळीचा डबा काढायला सांगायचे. रांगोळीचे पुस्तक त्यावरच असायचे. आई तिच्याकडून माळा साफ करून घ्यायची. घरातील दिवाळीला लागणारी भांडी घासूनपुसून घ्यायची. मी संपलेले रंग, रांगोळी, जमीन सारवायला गेरू बाजारातून घेऊन यायचे. सर्व दारे, खिडक्या मी आवडीने पुसून साफ करायचे. आईला लाडू, करंज्या, चकल्या वगैरे दिवाळीचे पदार्थ करायला मदत करायचे. पणत्या लावण्याआधी त्या पाण्यात घालून ठेवतात म्हणून त्या पाण्यात घालून ठेवायचे. आम्ही मातीचा किल्ला करायचो. त्यावर आम्ही अळीवाचे बी पेरायचो, त्याची छोटी झाडे किल्ल्यावर यायची. त्यावर छोटे खेळण्यातील सैनिक ठेवायचो. आम्हाला नवीन कपडे शिवले जात.
दिवाळीच्या दिवशी सर्वात आधी कोण उठून फटाके वाजवितो याची स्पर्धा असायची. सकाळी आम्ही थंडीत कुडकुडत उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करायचो. दारासमोर छान रांगोळी काढायचो, नवीन कपडे घालून देवळात जायचो आणि आल्यावर फराळाचा आस्वाद घ्यायचो. सकाळी, संध्याकाळी आकाशकंदील व छान ओळीत पणत्या लावायचो. फटाके वाजवायचो.
आता दीपावलीत पणत्यांबरोबर मेणबत्त्या, निऑन साइनचे दिवे लावले जातात. किल्ल्यांच्या स्पर्धा साजऱ्या केल्या जातात. लाडू, करंज्या वगैरे पदार्थ नेहमीच बाजारात तयार मिळत असल्यामुळे पूर्वीएवढे त्याचे अप्रूप राहिले नाही. बऱ्याच स्त्रिया नोकरी करत असल्यामुळे काही जणी वेळ काढून हौशीने पदार्थ तयार करतात, तर काही विकत आणतात. कपडे, दागिन्यांबरोबर आता दिवाळीच्या मुहूर्तावर काही जण कार, स्कूटर्स, घराची खरेदी करतात. शहरामध्ये तरुण मुले-मुली एखाद्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जमून हा सण साजरा करतात. हल्ली परदेशीही हा सण मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो.
असे असले तरीही वरील गोष्टींव्यतिरिक्त काही जण हा सण वेगळ्या प्रकारे सादर करतात. काही जणांची मुले-मुली परदेशी गेलेली असतात. दिवाळीत त्यांच्यासोबत ती नसतात. अशा वेळी ते किंवा इतर लोकसुद्धा गोरगरिबांना कपडे, फराळाचे वाटप करतात. त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहतात. त्यांच्यासोबत फटाके उडवून दिवाळी साजरी करतात. काही जण अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता अशांसाठी कामे करणाऱ्या संस्थांना देणग्या देतात.
आपणही या गोष्टी केल्या तर आपल्याबरोबर सर्वाचीच दिवाळी सुखाची जाईल व सर्वाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसेल. दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल.
– माधुरी साठे
डोंबिवली (पू.)