देशाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात असते असे नेहमी म्हटले जाते. त्यामुळे सुशिक्षित, संस्कारक्षम सुजाण, सजग पिढी तयार होणे अत्यंत गरजेचे ठरते. या सगळ्या प्रक्रियेत प्रत्येक मुलाच्या बाबतीत बालवयातील शालेय शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. कारण इथे त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक असा पाया घातला जातो. ज्यावर त्याच्या भविष्याची वाटचाल सुकर होते. शालेय शिक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊनच शाळाशाळांमधून या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील विविध क्षमतांचा विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत उपक्रम राबवण्यास आज बहुतेक शाळा प्रयत्नशील आहेत. पण त्यातही काही शाळा एखाद्या विषयाचे आकलन विद्यार्थ्यांना अगदी मुळातून व्हावे, त्यांना तो नीट समजावा, त्या विषयाची आवड निर्माण व्हावी आणि एकंदरीतच शिकणं या अनुभवाशी ते जोडले जावेत या दृष्टीने अधिक व्यापक दृष्टीने प्रयत्न करतात. त्या विशिष्ट विषयाच्या दृष्टीने कुछ हटके करू पाहतात, काहीशी वेगळी वाट निवडण्याचाही प्रयत्न करतात. आपण आपल्या या सदरामधून असे काही वेगळे प्रयत्न जाणून घेणार आहोत.
शालेय विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणविषयक मार्गदर्शन प्राप्त व्हावे या दृष्टीने शाळाशाळांमधून कार्यानुभव विषय असतो. या विषयाअंतर्गत ३५ पर्याय एस.एस.सी. बोर्डाने दिले आहेत. कळव्यातील ज्ञानप्रसारिणी शाळेत (भाऊ कुंटे यांची शाळा) इ.९वी व इ. १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेकरी आणि कुकरी हा विषय आहे. विद्यार्थ्यांना भारतीय खाद्यसंस्कृती, विविध प्रांतातील खाद्यपदार्थ, त्यातील विविध अन्नघटक, त्याची पोषणमूल्ये, त्यामागील शारीरिक आरोग्य दृष्टीने केलेला विचार इ. दृष्टीने माहिती व्हावी, (त्यांनी माहिती करून घ्यावी, संदर्भाच्या दृष्टीने पुस्तके चालावीत, नेटचा उपयोग करून अधिक माहितीसाठी प्रयत्न करावेत.) म्हणून प्रयत्न केले जातात. एखादा विषय ठरवून त्या विषयाचा सर्वागाने वेध घेताना प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न इथे केला जातो.
भारतीय खाद्यपदार्थ हा विषय आवर्जून निवडण्यात आला होता. सध्याच्या काळात पिझ्झा, बर्गर, चिप्स, नूडल्स इ. विदेशी पदार्थाची प्रचंड क्रेझ तरुण पिढीमध्ये आहे. त्या तुलनेत उपमा, पोहे, शिरा/सांजा, उकड इ. खाद्यपदार्थ खूप मागे पडले आहेत. रोजच्या जेवणातही आपला चौरस आहार आपले भा. संस्कृतीचे खास वैशिष्टय़. त्याऐवजी चटकमटक पदार्थानी जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांना हा फरक कळावा, चौरस आणि साविक आहाराचे महत्त्व लक्षात यावे या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आहार कसा असावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, विविध अन्नघटक, पोषणमूल्ये यांचे महत्त्वही समजावून दिले गेले. विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आणि मग राज्ये वाटून देण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिणेकडील राज्ये, पंजाब. सर्व पदार्थ शाकाहारी, प्रांताचे वैशिष्टय़ सांगणारी सजावट व विद्यार्थ्यांचा पेहराव, जे पदार्थ निवडण्यात आले होते त्यांची कृती, पौष्टिक मूल्ये, आहारशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व इ. माहिती देणारे तक्ते तयार केले गेले. माहिती देणारे विद्यार्थी त्या राज्याची भाषाही थोडीफार शिकले होते. महाराष्ट्र राज्याच्या गटाने गणेशोत्सवाची आरास केली होती. विद्यार्थी धोतर-कोट, टोपी तर विद्यार्थीनी नऊवारी साडी, नाकात नथ अशा पेहरावात होत्या. आपल्या महाराष्ट्रीय खास पदार्थाबरोबर म्हणजे मोदक, मसालेभात, उसळ इ. घावन-घाटले हा तुलनेने हल्ली घरोघरी कमी होणारा पदार्थ आवर्जून ठेवण्यात आला होता. जळगावचे जे खास पदार्थ आहेत त्यामध्ये फुंदका हा फारसा परिचित नसलेला पदार्थ आवर्जून ठेवण्यात आला होता. डाळी भिजवून, वाटून, त्याचे फुंदके उकडतात, मग कुस्करून त्यावर फोडणी घालून खाल्ले जातात. काही जण ढोकळ्यासारखे थापून, उकडून त्यावर फोडणी घातली जाते.
त्यानंतर एकदा भारतीय सरबते हा विषय निवडण्यात आला होता. तरुण पिढीला शीतपेयांची विशेष आकर्षण आहे. ऋतुमानानुसार आपण आपला आहार घेऊन शारीरिक आरोग्य राखू शकतो हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय़. लिंबू, आवळा, कोकम, अशी सरबते, कैरीचे पन्हे किंवा संत्र, अननस यापासून केली जाणारी सरबते मांडण्यात आली. सरबत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कृती, लागणारा वेळ, त्यापासून मिळणारे फायदे याची माहिती देणारे तक्तेही मांडण्यात आले.
आपल्या खाद्य संस्कृतीत स्वयंपाकघरातल्या अनेक पदार्थाचा रोजच्या स्वयंपाकात कुशलतेने वापर करून आरोग्याची सहजच काळजी घेण्याचा प्रयत्न दिसून येतो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. हळद, हिंग, जिरे, मिरे, आले इ. पदार्थाचे उपयोग आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व कळावे म्हणून आजीबाईचा बटवा असे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रत्येक घटक आणि त्याचे महत्त्व, त्याचे उपयोग, विविध पदार्थात कसा वापर करावा इ. स्वरूपाची माहिती देणारे तक्ते व ते पदार्थ मुद्दाम मांडण्यात आले होते. उदा- हळद फोडणीत, जखमेवर, त्वचेला उटणं म्हणून, दूध-हळद औषध म्हणून इ. माहिती तक्त्यात देण्यात आली होती. असे वेगळे प्रयत्न केल्यास विद्यार्थी त्यात सामील होतात, उत्साहाने माहिती गोळा करतात, खूप मेहनत घेतात असे शाळा सांगते.
हेमा आघारकर