ठाणे परिसराला तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. अगदी सातवाहन काळापासून येथे नांदलेल्या विविध नागरी संस्कृतीच्या खुणा जिल्ह्य़ात ठिकठिकाणी सापडत आहेत. या सांस्कृतिक ठेव्याची नव्या पिढीला नीट ओळख व्हावी म्हणून ठाणे जिल्ह्य़ास स्वतंत्र वस्तुसंग्रहालयाची आवश्यकता आहे. टेंभीनाका परिसरातील टाऊन हॉलमध्ये जिल्हा प्रशासन छोटेखानी का होईना पण वस्तुसंग्रहालय साकारीत असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे, असे मत मुंबईतील राजा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक डॉ. सदाशिव गोरक्षकर यांनी व्यक्त केले. मात्र काही दुर्मीळ छायाचित्रे, प्राचीन शिल्पांचे प्रदर्शन एवढय़ाचपुरते ते मर्यादित राहू नये. या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक जडणघडणीचा परिचय करून दिला गेला पाहिजे. त्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करायला हवीत. त्या संवादातूनच आधुनिक ठाण्याला प्राचीन ठाण्याची ओळख होईल, असेही ते म्हणाले.
उदासीनतेची धूळ
ठाणे जिल्ह्य़ात ठिकठिकाणी ऐतिहासिक खुणा आणि दस्तऐवज सापडत असले तरी त्यांची जपणूक करण्याबाबत शासकीय यंत्रणा कमालीची उदासीन आहे.  त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक खुणा नष्ट होत आहेत. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी शिलाहारकालीन शिळाशिल्पे आढळतात. अंबरनाथ येथील मंदिराचा अपवाद वगळता इतर सर्व मंदिरे आता भग्नावस्थेत आहेत. भिवंडीतील लोनाड, शहापूर तालुक्यातील अटगाव येथेही प्राचीन मंदिराचे अवशेष सापडतात. अनेक ठिकाणी पुरातन शिल्पे सापडली. पण पुरातत्त्व खात्याने उदासीनता दाखविल्यामुळे  ती बेपत्ता झाली आहेत.