थांबा मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेल्वेचा घोळ; प्रवाशांत संताप

वसई स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या वातानुकूलीत लोकल ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पुढील नालासोपारा स्थानकात उतरून माघारी फिरावे लागले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी चर्चगेटहून विरारसाठी एसी लोकल सुटते. ती वसईला संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचते. शुक्रवारीनेहमीप्रमाणे ही लोकल वसई स्थानकात येऊन थांबली. उतरण्यासाठी प्रवासी दाराजवळ आले खरे, मात्र एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाही. त्यामुळे प्रवासी गोंधळले. दरवाजे उघडले नाहीत आणि ट्रेन सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना पुढील स्थानकात म्हणजे नालासोपारा स्थानकात उतरून पुन्हा दुसरी साधी लोकल पकडून वसईला परतावे लागले.

एसी लोकलला पूर्वी नालासोपारा स्थानकात थांबा नव्हता. तो गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्याच दिवशी रेल्वे प्रशासनाने हा घोळ घातला.

आम्ही नियमित या ट्रेनने प्रवास करतो. परंतु पहिल्यांदा असा अनुभव आला. काही प्रवाशांनी याबाबत विरार स्थानकात स्टेशन मास्तरकडे तक्रार केली आहे.

– नितीन भोईर, प्रवासी