ऋषिकेश मुळे

रायगडमध्ये बॉम्ब आढळल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश

रायगड जिल्ह्य़ातील कर्जतहून आपटा येथे वस्तीला आलेल्या राज्य परिवहन सेवेच्या बसमध्ये बुधवारी बॉम्ब आढळल्याच्या घटनेनंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनोळखी व्यक्तींकडून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहचविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वस्तूंची बसमधून यापुढे वाहतूक करू नये, असा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे.

दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे बेकायदा वस्तूंच्या वाहतुकीला लगाम बसण्याची चिन्हे आहेत.

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना आठ दिवसांपूर्वीच घडली असून या हल्ल्यामध्ये ४६ जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातील सर्वच सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या असतानाच बुधवारी कर्जतहून आपटा येथे वस्तीला आलेल्या राज्य परिवहन सेवेच्या बसमध्ये बुधवारी बॉम्ब आढळला. या प्रकारामुळे एसटी बसमधून स्फोटकांची वाहतूक करून देशविघातक कृत्य घडविण्याची शक्यता असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एक परिपत्रक काढले आहे.

राज्य परिवहनच्या बसमधून नागरिकांना काही वेळेस प्रवास करायचा नसतो. पण, त्यांच्याकडील वस्तू दुसऱ्या स्थानकात उभ्या असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचवायची असते. अशा वेळेस हे नागरिक वाहक-चालकास विनंती करून त्यांच्याकडील वस्तू दुसऱ्या स्थानकापर्यंत नेण्यास सांगतात. त्याप्रमाणे त्या वस्तूंची वाहक-चालक दुसऱ्या स्थानकापर्यंत वाहतूक करून संबंधित व्यक्तीच्या ताब्यात देतात. याच पद्घतीचा अवलंब करून दहशतवादी बसमध्ये स्फोट घडवून आणू शकतात.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व चालक आणि वाहकांना आगार व्यवस्थापकांनी परिपत्रकाद्वारे अनधिकृतपणे सामानाची वाहतूक करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वीही सुरक्षा आणि दक्षता विभागातर्फे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

– शैलेश चव्हाण राज्य परिवहन -विभाग नियंत्रक, ठाणे</p>