उल्हासनगरमधील वस्त्रविक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची नामी योजना

लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : शंभरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पेट्रोलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या पोटात गोळा उठत असतानाच उल्हासनगरच्या एका हातमाग वस्त्रे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने थेट एक हजार रुपयांच्या खरेदीवर पैशांची सूट देण्याऐवजी एक लिटर पेट्रोल देण्यास सुरुवात केली आहे. शहरातल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपासोबत तसा थेट करारच या व्यापाऱ्याने केला आहे. सध्या शहरात या खास योजनेची चर्चा रंगली आहे.

सुरुवातीच्या काळात नामांकित कंपन्यांच्या वस्तूंची हुबेहूब नक्कल वस्तू बनवण्यासाठी उल्हासनगर शहरातील व्यापारी आणि उत्पादकांची ओळख होती. येथील व्यापाऱ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून अनेक नवनव्या वस्तू बाजारात आणून ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे पेट्रोलच्या किमती शंभरीच्या उंबरठय़ावर असतानाच शहरातील एका व्यापाऱ्याने याचाच फायदा घेत चक्क खरेदीवर पेट्रोल मोफत ही योजना आणली आहे. उल्हासनगर कॅम्प दोन भागातील सिरू चौक परिसरात शीतल हॅण्डलूम नावाचे हातमाग वस्त्रविक्रीचे दुकान आहे. दुकान मालक ललित शेवकानी गेल्या २५ वर्षांपासून येथे व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानातून चादरी, पडदे आणि इतर कोणतेही कपडे अशी एकूण १ हजार रुपयांची खरेदी केल्यास त्या ग्राहकाला ललित शेकवानी शहरातल्या १७ सेक्शन परिसरातील एचपी पेट्रोल पंपाचे एक लिटर पेट्रोलचे कूपन देतात. त्यावर ग्राहकाच्या वाहनाचा क्रमांक नमूद केलेला असतो. ग्राहकाने त्या पेट्रोल पंपावर वाहन नेल्यास त्याला एक लिटर पेट्रोल दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत असताना ग्राहकांना इतर कोणतीही सूट देण्यापेक्षा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पेट्रोलची भेट द्यावी, या विचारातून ही योजना सुरू केल्याचे ललित शेवकानी सांगतात. गेल्या दोन दिवसांत ५०हून अधिक ग्राहकांना ७०हून अधिक लिटर पेट्रोलची भेट दिल्याचेही ललित शेकवानी सांगतात. त्यांच्या या योजनेची सध्या उल्हासनगर आणि आसपासच्या शहरांमध्ये जोरदार चर्चा आहे. करोनाच्या संकटात एखाद्या खरेदीवर थेट महागडय़ा पेट्रोलची मिळणारी भेट ही ग्राहकांनाही सुखावून जात आहे.