02 March 2021

News Flash

कॉलेजच्या कट्टय़ावर : डॉक्टर, अभिनेता ते नेता..

वैद्यकीय क्षेत्रातून पदवी मिळवल्यानंतर अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. अमोल कोल्हे राजकीय क्षेत्राची वाटही चोखाळत आहेत.

| January 22, 2015 01:13 am

college-kattaवैद्यकीय क्षेत्रातून पदवी मिळवल्यानंतर अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. अमोल कोल्हे राजकीय क्षेत्राची वाटही चोखाळत आहेत. वैद्यकीय, tvvish04चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अमोल कोल्हेंचा हा प्रवास उलगडण्यासाठी सीएचएम महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या विशेष  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि महाविद्यालयीन महोत्सवाची सांगता होणार आहे. त्या वेळी सकाळी दहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंडळ, कोकण विभागाचे साहाय्यक संचालक विजय नार्खिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘से नो टू प्लास्टिक’
उल्हासनगर : सीएचएम महाविद्यालयाच्या वतीने १२ ते १७ जानेवारी दरम्यान महाविद्यालयात ‘नो प्लास्टिक’ दिवस पाळण्यात आला असून या काळात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करू पाहण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मोहिमा, कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्लास्टिक बंदी दिवस पाळण्यात आला, अशी माहिती महाविद्यालयातील व्यवस्थापनाने दिली. महिन्याच्या पहिल्या शनिवारी महाविद्यालयामध्ये वाहन प्रवेश बंदी दिवस पाळला जात आहे. या दिवशी महाविद्यालयाच्या आवारात एकही वाहन आणू नये, अशा स्वरूपाच्या सूचना विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महिन्यातून किमान एक वेळा सायकल दिवस पाळून इंधन वाचविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या संस्थांकडून केला जात आहे. असे असताना शनिवारी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा महाविद्यालयाच्या आवारामध्ये वाहने आणत नाहीत.

नवमतदारांनो तुमच्यासाठी..
कल्याण : २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येत असून त्या निमित्ताने बिर्ला महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निबंध स्पर्धा, पोस्टर्स आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सुरू झालेल्या या स्पर्धा शुक्रवापर्यंत सुरू राहणार आहेत. महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या वतीने या स्पर्धा राबवण्यात येत आहेत, अशी माहिती समितीचे प्रमुख नितीन बर्वे यांनी दिली. २०१४ हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचे वर्ष होते. या निमित्ताने मतदारांमधील जागृती लक्षात आली असली तरी ही जागृती कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची माहिती पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे बर्वे यांनी सांगितले. निवडणूक अगदी गल्ली स्तरावरील असली तरी मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावायलाच हवा. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा उपक्रमाचा प्रयत्न आहे. मतदार यादीत नाव कसे नोंदवावे तसेच यासाठी आपण कसे आग्रही असायले हवे यासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न होता, असेही बर्वे यांनी स्पष्ट केले.    

बिर्ला महाविद्यालयात अर्थशास्त्र परिषद
कल्याण : कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात २९ ते ३१ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बिर्ला कॉलेज आणि अ‍ॅकॅडमी ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड रिटेल मॅनेजमेंट, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद भरणार आहे. बिर्ला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राधिका लोबो यांना या परिषदेच्या निमंत्रकपदाचा मान देण्यात आला आहे. युरोपियन राष्ट्रांच्या धर्तीवर ब्रिक्स राष्ट्र स्वत:चे एक चलन बाजारात आणू शकतात का, या विषयावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन अशा राष्ट्रांमधील आर्थिक समस्या, तेथील विकासाचा दर, विकासात येणाऱ्या अडचणी, विक्री क्षेत्रातील समस्यांवर या परिषदेत खुली चर्चा होणार आहे. देशातील तसेच परदेशातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून अर्थविषयक असे ५० पेक्षा अधिक शोधनिबंध या परिषदेत
सादर केले जातील.
व्यवसाय आणि व्यवस्थापनातील सध्याच्या समस्यांवर वेगवेगळ्या क्षेत्रांतील जाणकारांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून याशिवाय नऊ वेगवेगळ्या विषयांवरची चर्चासत्रे या ठिकाणी भरवली जाणार आहेत. देश, परदेशातील अर्थशास्त्रात पारंगत असलेल्या जाणकारांकडून त्यांची मते जाणून घेणे हा या परिषदेचा एक उद्देश आहे, अशी माहिती प्रा. नितीन बर्वे आणि शीतल चित्रे यांनी दिली.

उदित नारायण यांना सीएचएमचा गौरव पुरस्कार
tvvish03ठाणे :  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन समाजात आदर्शवत कामाने आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयातर्फे दरवर्षी गौरवण्यात येते. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना देण्यात येणार आहे. २८ जानेवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा रंगणार आहे. रवींद्र जैन, उस्ताद झाकीर हुसेन, परविन सुलताना, दिलशाद खान, गुलझार, जगजितसिंग, राजेश खन्ना, सुरेश वाडकर, राम जेठमलानी, डॉ. इंदू सहानी, शंकर महादेवन अशा दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणा मिळावी असा उद्देश हा पुरस्कार सुरू करताना ठेवण्यात आला. त्यासाठी प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासन यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या मार्फत या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाते. पहिला पुरस्कार २००१ रोजी रवींद्र जैन यांना देण्यात आला. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मा देशमुख यांनी दिली.  

कॉलेज कट्टय़ावर तुमचेही स्वागत
ठाणे जिल्ह्य़ात असंख्य महाविद्यालये आहेत. तेथे सातत्याने काहीना काही उपक्रम, कार्यक्रम होत असतात. तुमच्याही महाविद्यालयात एखादा कार्यक्रम, स्पर्धा, उपक्रम राबवण्यात येत असेल, तर ‘कॉलेज कट्टय़ा’वर आमच्याशी शेअर करा. तुमच्या महाविद्यालयातील एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांतही तुम्ही पुढील पत्त्यावर/ फॅक्स/ ईमेलवर पाठवू शकता. सोबत छायाचित्रे असल्यास उत्तमच!
कॉलेज कट्टा : ई मेल : newsthane@gmail.com, loksatta.thane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:13 am

Web Title: doctor actor and politician
टॅग : Doctor,Politician
Next Stories
1 सहजसफर : ..छान किती दिसते!
2 बीट ऑफ : चैत्र चांदणे फुलले!
3 ठाणे.. काल आणि आज
Just Now!
X