News Flash

तब्बल ४० दिवस महिलेच्या पोटात कापसाचा गोळा

महापालिका रुग्णालयाची हलगर्जी उघड; पोलीस ठाण्यात तक्रार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महापालिका रुग्णालयाची हलगर्जी उघड; पोलीस ठाण्यात तक्रार

वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर एका महिला रुग्णाच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ४० दिवसांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून कापसाचा गोळा काढण्यात आला. या महिलेने पालिका रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

शमा अली (३३) ही अपंग महिला नालासोपाऱ्यात पती शब्बीर अलीसह राहते. अपघातात तिचा एक हात निकामी झाला असून तिचा पती शब्बीरही पायाने अधू आहे. एप्रिल महिन्यात ती पालिकेच्या तुळींज रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. २७ एप्रिल रोजी तिने बाळाला जन्म दिला आणि ३० एप्रिल रोजी तिला डॉक्टरांनी घरी सोडले. मात्र तिच्या पोटात दुखत होते. सुरुवातीला तिने या त्रासकडे बाळंतपणातील दुखणे म्हणून दुर्लक्ष केले. नंतर मात्र पोटात असह्य वेदना होऊ  लागल्या. त्यानंतर अली दांपत्याने खाजगी डॉक्टरांकडे तपासणी केली. या तपासणीत काहीतरी बाह्य वस्तू पोटात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शस्त्रक्रिया केली असता कापसाचा बोळा आढळून आला. बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी हा कापसाचा बोळा राहिला होता. यामुळे अली दांपत्याला धक्का बसला असून त्यांनी यासाठी पालिकेच्या डॉक्टरांना हलगर्जीसाठी जबाबदार धरले आहे. तब्बल ४० दिवस हा कापसाचा बोळा शमाच्या पोटात होता.

महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र चौहान यांनी हलगर्जीचा आरोप फेटाळून लावला आहे. बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेदरम्यान (सिझेरियन) हे कापूस वापरले जाते. संबंधित महिलेला अतिरक्तस्राव होत होता. त्यामुळे त्याचा वापर करण्यात आला. परंतु रुग्णालयातून सोडल्यानंतर दोन दिवसांनी तिला यायला सांगितले होते. मात्र ती महिला आली नाही, असे ते म्हणाले. ती जर आली असती तर तो कापसाचा बोळा काढून टाकला असता, असेही ते म्हणाले.

अली दांपत्याने या घटनेने जबर मानसिक धक्का बसल्याचे सांगून हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसा अर्ज त्यांनी सोमवारी तुळींज पोलीस ठाण्यात दिला. आमच्याकडे अर्ज आलेला आहे, परंतु वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:11 am

Web Title: doctor leaves cotton gauze inside a womans stomach
Next Stories
1 आरोपी दुसऱ्याच्याच हत्येसाठी नालासोपाऱ्यात?
2 गावे वगळणे शक्य?
3 धक्कादायक! पॉर्नच्या आहारी गेलेल्या १४ वर्षाच्या मुलाने १६ वर्षाच्या बहिणीवर केला बलात्कार
Just Now!
X