22 February 2020

News Flash

ठाण्यातील समस्यांना माहितीपटांद्वारे वाचा

यूटय़ूब आणि इन्स्टाग्रामवर ‘टाइमलॅप्स अंडरस्कोर हंड्रेड’ या वाहिन्यांवर हा माहितीपट पाहायला मिळतो.

ठाणे, डोंबिवली, दिवा येथील खड्डे, वाहतूक कोंडींवर प्रभावी भाष्य

ऋषिकेश मुळे / आशीष धनगर, ठाणे

जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा अशा समस्यांच्या नावाने खडे फोडत ठाणेकर रोजचा दिवस ढकलत असतात. ‘दाद तरी कुणाकडे मागायची’ असा त्यांचा प्रश्न असतो. परंतु, ठाण्यातील काही तरुण मंडळींनी थेट माहितीपटांतूनच हा विषय मांडून त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती होत नसल्यामुळे तेथील काही युवकांनी तयार केलेला ‘मी रस्ता बोलतोय’ हा माहितीपट सध्या समाजमाध्यमांवर तुफान गाजत आहे. दिव्यातील समस्यांवरही अशाच प्रकारे ‘दिवा एक भयाण सत्य’ असा माहितीपट तयार करण्यात आला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या वेशावर दररोज होणाऱ्या भयाण कोंडीचे चित्रीकरणही गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे.

रस्त्यांवर पडलेले खड्डे, सातत्याने विजपुरवठा खंडित होणे यांसारख्या एक ना अनेक समस्या या माहितीपटांच्या माध्यमातून मांडण्यात येत आहेत. डोंबिवली येथील काही तरुणांनी एकत्र येत डोंबिवली शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवर एक माहितीपट तयार केला आहे. यूटय़ूब आणि इन्स्टाग्रामवर ‘टाइमलॅप्स अंडरस्कोर हंड्रेड’ या वाहिन्यांवर हा माहितीपट पाहायला मिळतो. या माहितीपटाद्वारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे होत असलेले दुर्लक्ष, महापालिकेतील अधिकारी, नगरसेवक आणि कंत्राटदार हे बेजबाबदार आणि भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक नागरिक शहरातील रस्त्यावर पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांवरून प्रवास करतात. ही खड्डय़ांची समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच माहितीपट तयार केल्याचे माहितीपट तयार करणाऱ्या समूहातर्फे सांगण्यात आले आहे.

दिव्यातील वाढत्या अनधिकृत चाळी, पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर दिव्यात साचणारे पाणी, डम्पिंगला आग लागल्यामुळे दिवेकर नागरिकांना होणारा त्रास, सातत्याने दिव्यात होणारा विजेचा खोळंबा यावर ‘दिवा एक भयाण सत्य’ या माहितीपटातून भाष्य करण्यात आले आहे. दिव्यात घरे स्वस्त मिळत असल्याने अनेक नागरिक या ठिकाणी राहायला आले. परिणामी महामुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या पडणाऱ्या रेल्वे फेऱ्यांमुळे दिव्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या दिव्यातील नागरिकांना मोठय़ा हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून ठाणे महापालिका दिवा शहर हे फक्त नकाशावर मिरवण्यापुरतेच लावत असल्याचे माहितीपटाद्वारे सांगण्यात आले आहे. बदलापूर येथील बदलापूर या इन्स्टाग्राम पेजद्वारेही बदलापूरमधील समस्या नागरिकांपुढे मांडल्या जात आहेत. वाढते शहरीकरण आणि मुसळधार पावसामुळे नुकतेच तुंबलेले बदलापूर यावर भाष्य करण्यात आले.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. ही समस्या मांडण्यासाठी आम्ही माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाला समाजमाध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढेही आम्ही शहरातील समस्या मांडणारे माहितीपट तयार  करणार आहोत.

– निगम बागवे, सदस्य- टाइमलॅप्स अंडरस्कोर हंड्रेड

First Published on August 21, 2019 4:49 am

Web Title: documentary film on thane problems zws 70
Next Stories
1 ठाण्यात मराठा मोर्चा, शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक
2 महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला सक्तमजुरी
3 मालकीचे घर आहे, पण शौचालय नाही!