विरार : अर्नाळा येथे एका ११ वर्षीय बालकावर २० ते २५ श्वानांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अर्नाळा किल्ला परिसरात राहणारा निर्वाद मेहेर आपल्या आईसोबत बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान दुकानात जात असताना अचानक श्वानांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात श्वानांनी निर्वादच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले. निर्वादच्या आईने माहिती देताना सांगितले की, आम्ही दुकानावर सामान घेण्यासाठी जात होतो. निर्वाद पुढे धावत होता. धावत्या निर्वादला पाहून अचानक श्वान त्याच्या मागे धावू लागले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. स्थानिकांच्या मदतीने निर्वादला श्वानांच्या तावडीतून सोडवले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वसई-विरार परिसरात भटक्या श्वानांचे हल्ले वाढले आहे. महापालिका श्वान निर्बीजीकरणाचे कागदी घोडे नाचवत असल्याने शहरात भटक्या श्वानांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अर्नाळा परिसरात मोठय़ा प्रमाणात कचरा साचत असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तो उचलला जात नसल्याने भटक्या श्वानांची दहशत वाढली आहे.

अर्नाळय़ात येणाऱ्या अनेक पर्यटकांवरही श्वानहल्ले होण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. महापालिकेने तातडीने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवासी जनार्दन मेहेर यांनी केली आहे.