डोंबिवलीतील अनोख्या सौंदर्य स्पर्धेत श्वानांचा ‘कॅटवॉक’

देशातील महत्त्वाच्या क्षेत्रातील अनागोंदी आणि भ्रष्टाचारावर कोरडे ओढणाऱ्या ‘मुन्नाभाई’ चित्रपटातील डॉन संजय दत्त आणि ‘सर्किट’ अर्शद वारसी यांच्या पेहरावात रॅम्पवर आलेला श्वान आणि अलिकडेच भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांवर घातलेली बंदी  व त्यानंतर आलेल्या गुलाबी रंगातील दोन हजार रुपयांच्या नोटांची माळ गळ्यात घालून आलेल्या श्वानांनी रविवारी डोंबिवलीत झालेल्या श्वान सौंदर्य स्पर्धेत रुबाब दाखवला.

[jwplayer OnydZc5l]

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन आणि प्रिमीयम पेट्स’ यांच्या वतीने रविवारी येथील स. वा. जोशी शाळेच्या मैदानात पाळीव श्वानांची सौंदर्य स्पर्धा भरविण्यात आली होती.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, सांगली, सातारा, पुणे, कर्जत, नेरळ, नवी मुंबई, या भागातून ३० प्रजातीच्या साधारण २७२ श्वानांनी उपस्थिती दर्शवली होती.

या स्पर्धेत ‘किंग ऑफ शो’चा किताब कल्याणच्या लिओ नावाच्या सेंट बर्नान्ड, तर क्वीन ऑफ शोचा किताब डोंबिवलीच्या विन्सी नावाच्या डाल्मेसियन या जातीच्या श्वानांनी पटकावला.

यात सायबेरीयन हास्की, सेंट बर्नाड, माऊंटन डॉग, पॉम डॉग, सिक्युरीटी डॉग, पोलिस डॉग, न्युओपोलिन मासचिफ, ग्रेट डेन, जॉईंट ब्रिड, लॅब्राडॉर, चुहाहुआ, पॉकेट पॉम डॉग, रॉटवायलर, जर्मन शेफर्ड, पग, हॉवर्ड, गोल्डन रिट्रिव्हर, डाल्मेशियन, ल्हासा, डॉबरमॅन, पॉमेरिअन, क्रॉकर स्पॅनिअल अशा विविध जातींचा समावेश होता.

दुपारी तीन वाजल्यापासूनच श्वान व त्यांच्या मालकांनी मैदानावर गर्दी केली होती. यावेळी श्वानांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

२० डॉक्टरांच्या पथकांनी श्वानांची आरोग्यतपासणी केली. रॅम्पवर चालणाऱ्या श्वानांनी परिधान केलेले कपडे हेही एक चर्चेचा विषय ठरले. काही श्वान मुन्नाभाई – सर्कीटच्या भूमिकेतील पेहरावात होते; तर एका श्वानाने नुकत्याच चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचा हार परिधान केला होता.

श्वानप्रेम वाढावे..

शहरातील श्वानप्रेमींना वेगवेगळ्या प्रजातीचे श्वान पहाण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. श्वानांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यांचे व्यक्तीमत्व, आवडी निवडी आदींची माहिती याद्वारे मिळत असल्याने दरवर्षी श्वानप्रेमी या कार्यक्रमाला गर्दी करतात. मोठमोठय़ा शहरात श्वानांसाठी पार्लर, स्पा, पेट शॉप ओपन आहेत, त्याचीही माहिती अनेकांना नसते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून श्वानप्रेमींना या ठिकाणांची व इतर गोष्टींची माहिती होते. श्वानांविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे प्रकल्प प्रमुख अमर बनसोडे यांनी सांगितले.

[jwplayer 1yLms27W]