डोंबिवलीच्या स्फोटात गबरू नावाचा श्वान बेपत्ता झाला आणि त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याचे पालनपोषण करणारे गिरी कुटुंबीय चिंतेत होते, मात्र ‘पॉझ’ संस्थेच्या मदतीने आठ दिवसांनंतर गबरू पुन्हा घरी परतला. त्याला पाहून गिरी कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि मालक पुन्हा भेटल्यामुळे गबरूनेही आनंद व्यक्त केला.
डोंबिवली येथील प्रोबेस कंपनी परिसरातील निवासी भागात रवी गिरी राहातात. त्यांच्याकडे गबरू नावाचा श्वान आहे.
गेल्या आठवडय़ात गुरुवारी प्रोबेस कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने गिरी कुटुंब घराबाहेर पळाले. त्यांच्यापाठोपाठ गबरूही घरातून बाहेर पडला आणि लोकांच्या गर्दीत हरवला. कुटुंबातील सदस्य असलेला गबरू अचानक बेपत्ता झाल्यामुळे गिरी कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, गेल्या आठ दिवसांत त्याचा कुठेही शोध लागत नव्हता. स्फोटानंतर भेदरल्यामुळे तो बालाजी मंदिर परिसरातून जात असताना मोहिनी चौरसिया यांनी त्याला पाहिले. त्यानंतर त्यांनी घरी नेऊन त्याचा सांभाळ सुरू केला. तर दुसरीकडे गिरी कुटुंबीय गबरूचा शोध घेत होते. स्फोटातील जखमी प्राण्यांवर पॉझ संस्था उपचार करत असल्याची माहिती गिरी कुटुंबीयांना मिळाली.
त्यामुळे गिरी कुटुंबीयांनी पॉझ संस्थेचे नीलेश भणगे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना गबरू बेपत्ता झाल्याचे सांगितले. तसेच गबरूची काही माहिती मिळाली किंवा उपचारासाठी दाखल झाला तर आम्हाला तत्काळ कळवा, असे त्यांनी नीलेश यांना सांगितले.
समाज माध्यमांवर गबरू बेपत्ता झाल्याचा संदेश नीलेश यांनी प्रसारित केला. हा संदेश मोहिनी यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांनी नीलेश यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नीलेश यांच्या संस्थेने मोहिनी यांच्या घरी जाऊन तो गबरू असल्याची खात्री केली आणि गिरी कुटुंबीयांना गबरू सापडल्याचे लगेचच कळविले.
स्फोटात गिरी यांच्या घराची पडझड झाल्याने ते सध्या देशमुख होम्स येथे राहात आहेत. पॉझ संस्थेने गबरूला त्यांच्या घरी नेले. त्यावेळी गबरूला पाहून गिरी कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही तसेच मालकाला पाहून गबरूनेही आनंद व्यक्त केला.