‘टायसन’ मदतीला धावला; हल्लेखोराला अटक

कल्याण येथील मोहने परिसरातील यादवनगरमध्ये पोलीस हवालदार उत्तम अडसुळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोराने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि  पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच वेळी अडसुळे यांच्यासोबत असलेल्या त्यांचा ‘टायसन’ नावाचा श्वान मदतीसाठी धावून आल्याने त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी सोमवारी अटक केली.

कल्याण शहरात गणेशविसर्जनादरम्यान पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सायंकाळी मोहने येथील यादवनगरमध्ये पोलीस हवालदार उत्तम अडसूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. मोहने येथील यादवनगर परिसरातील टीचर्स कॉलनीत उत्तम अडसूळ (४९) राहत असून ते ठाणे पोलीस मुख्यालयात हवालदार पदावर काम करतात. पत्नी, दोन मुले, सुना आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्याकडे ‘टायसन’ नावाचा श्वान असून तो पाच महिन्यांचा आहे. शनिवारी रात्री त्यांची डय़ुटी होती. कामावर जाण्यापूर्वी दोन तास आधी ते ‘टायसन’ला फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर घेऊन गेले होते. काही वेळानंतर तेथून ते पुन्हा घरी परतत होते. त्याच वेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सचिन शेडगे या तरुणाने त्यांच्या पाठीमागून डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. या हल्ल्यात ते खाली पडले. त्याने पुन्हा प्रहार करण्यासाठी लोखंडी रॉड उगारला, मात्र त्याच वेळी अडसूळ यांच्यासोबत असलेला ‘टायसन’ सचिनच्या अंगावर धावून गेला. टायसनच्या भीतीपोटी त्याला पुन्हा हल्ला करणे शक्य झाले नाही आणि तो तेथून पळून गेला. त्यानंतर स्वत:ला सावरत उत्तम हे उभे राहिले आणि घराच्या दिशेने निघाले. त्यांच्या पाठोपाठ टायसनही निघाला. त्या वेळी सचिनने पाठीमागून येऊन त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.