ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर परिसरात रविवारी खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीचा भटक्या श्वानाने चावा घेतला. श्वानाच्या हल्ल्यामुळे तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून तिचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भागात

मुस्कान अन्वर शेख (९) असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ती वर्तकनगर येथील साईनाथनगर परिसरात राहते आणि माजिवाडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेत दुसरीत आहे. रविवारी दुपारी ती घराजवळ दोन-तीन मित्रांबरोबर खेळत होती. त्या वेळी एका भटक्या श्वानाने तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे ती पडली. त्यानंतर श्वानाने तिच्या डोळ्याजवळ आणि डोक्याजवळ चावा घेतला. तिचे मित्र तिथून पळून गेल्यामुळे बचावले.

मुस्कानला उपचारांसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डोळ्याजवळ जखम असल्यामुळे तिला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. डोळ्याला इजा झाली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले असले तरी तिला अद्याप डोळा उघडता आलेला नाही. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले आहेत. डॉक्टरांनी तिला आता घरी सोडले आहे, अशी माहिती तिचे वडील अन्वर शेख यांनी दिली.

यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना या परिसरात घडल्या असून त्यामध्ये भटक्या श्वानाने मोठय़ा व्यक्तींना लक्ष्य केले होते. रविवारच्या घटनेसंदर्भात तक्रार केल्यानंतर महापालिकेने भटक्या श्वानांना पकडण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती स्थानिक रहिवासी निखिल जाधव यांनी दिली.