दररोज सरासरी २० जणांना कुत्र्यांचा चावा; वसई, विरार शहरांतील भटक्या श्वानांचा उपद्रव कायम

वसई, विरार या दोन्ही शहरांत ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्यावर पोसले जात असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून या कुत्र्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा उपद्रव होऊ लागला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दोन्ही शहरांमध्ये मिळून गेल्या चार महिन्यांत तब्बल चार हजार श्वानदंशाची प्रकरणे उजेडात आली आहेत. शहरांत दररोज सरासरी २० ते ३० जणांवर कुत्र्यांकडून हल्ला होत असल्याचे ही आकडेवारी सांगते. अर्नाळा येथे एका लहान मुलावर चार भटक्या श्वानांनी हल्ला चढवल्याच्या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विरार पूर्वेकडील अर्नाळा गावात रवी बद्री (६) या चिमुकल्यावर चार भटक्या श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या गावात जणू कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. सुमारे ३२ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे तसेच पालिकेकडून योग्य नियोजन होत नसल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येतात. या कचऱ्यात खाद्य मिळत असल्याने गावातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचे अर्नाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र पाटील यांनी सांगितले. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव केवळ अर्नाळा गावालाच होत नसून वसई आणि विरार या दोन्ही शहरांत सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या फोफावत असल्याचे समोर येत आहे. तसेच कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या वा त्यांच्यावर हल्ला केल्याच्या घटनाही वाढत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चालू वर्षांतील पहिल्या चार महिन्यांतच चार हजार ३२ नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या घटना घडल्या. गतवर्षीदेखील शहरांत दहा हजार श्वानदंशाच्या घटना घडल्या होत्या. या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २० ते ३० नागरिकांना श्वानदंश होत आहे.

दरम्यान, पालिकेकडे श्वानदंशाच्या लसींचा पुरेसा साठा असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पालिकेकडे सध्या नालासोपारा येथे ८० खाटांचे तुळींज रुग्णालय आणि वसईत सर डी.एम.पेटिट अशी दोन रुग्णालये आहेत. याशिवाय २१ आरोग्य केंद्रे, ९ दवाखाने, २ माता बालसंगोपन केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी श्वानदशांवरील लसींचा पुरेसा साठा असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र चौहान यांनी दिली. गेल्या तीन वर्षांत पालिकेने श्वानदंशावरील लसींसाठी एक कोटी ६८ लाख रुपये, तर श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीहून अधिक खर्च केला आहे. गेल्या तीन वर्षांत दहा हजार २५५ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचा पालिकेचा दावा आहे.