हल्ली दारोदारी मासळी विक्रेते येत असले तरी मंडईमध्ये जाऊन ताजी मच्छी विकत घेण्याकडे आजही नागरिकांचा कल आहे. डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केट गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असून या परिसराची ती एक ठळक खूण आहे. मात्र शहरातील या एकमेव मासळी बाजाराची अतिशय बकाल अवस्था आहे. त्यात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत.

डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच नाकाला रुमाल लावूनच नागरिक बाहेर पडतात. रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या मासळी बाजारामुळे या परिसरात सतत दरुगधीचे वातावरण असते. या मार्केटमध्ये मुंबई, कुलाबा येथून मच्छी येत असून १८० विक्रेते येथे व्यवसाय करतात. मात्र एवढी मोठी मंडई असूनही येथे शीतगृहाची व्यवस्था नाही. परिणामी मच्छी खराब होऊन परिसरात दरुगधी पसरते. तसेच येथे पाण्याची सुविधा नाही. मंडईतील सांडपाणी वाहून जाण्याचीही कोणतीच सुविधा नाही, येथील लाद्या उखडलेल्या आहेत. येथे उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. घोंगावणाऱ्या माश्यांमुळे येथे गलिच्छ वातावरण पाहावयास मिळते.

पूर्वी मासळी बाजारासमोरच कचराकुंडी होती. या कचराकुंडीतच येथील व्यापारी खराब झालेली मासळी टाकत असल्याने या परिसरात प्रचंड दरुगधी असे. याचा त्रास गेली कित्येक वर्षे विष्णूनगर पोलिसांनी भोगला आहे, परंतु आता ही कचराकुंडी येथून हलविण्यात आल्याने काहीसा फरक पडला आहे.

पालिकेच्या अख्यत्यारीत असूनही या बाजाराची वर्षांनुवर्षे विदारक अवस्था झाली असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंडईचा विकास रखडला आहे. १९९९ च्या पालिकेच्या महासभेत मंडईच्या विकासाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी पालिकेच्या उदासीनतेमुळे तो अद्यापपर्यंत रखडला आहे. पालिकेने मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते, वाहनतळ याचा विचार करून येथे सुविधा दिली तर या परिसरातील गर्दीही विभागली जाईल व वाहनतळ उपलब्ध झाल्याने पालिकेला महसूल मिळून नागरिकांची सोय होईल. याविषयी अनेकदा लोकप्रतिनिधींनीही आवाज उठविला आहे, परंतु अद्याप याची दखल घेतली गेलेली नाही.