डोंबिवलीतला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल धोकादायक आहे ही बाब आयआयटीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली आहे. हा उड्डाणपूल तातडीने रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डोंबिवलीकराना वाहतूक कोंडीचा सामना या निर्णयामुळे करावा लागण्याची चिन्हं आहेत. सद्यस्थितीत कोपर आणि ठाकुर्ली पुलावरून डोंबिवलीत दोन्ही बाजूस वाहतूक सुरू असते. मात्र आता कोपरच्या दिशेच्या पूल बंद करण्यात येणार असल्याने शाळांच्या बसेस, खासगी वाहने, रिक्षा वाहतूक या सगळ्याचा भार स. वा. जोशी शाळेजवळच्या नव्या ठाकुर्ली पुलावर येणार आहे. आधीच निमुळता असलेला ठाकुर्ली उड्डाण पूल वाहनांच्या भाराने कोंडीत अडकण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान कोपर दिशेचा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही याबबात स्थानिक वाहतूक पोलिसांकडे कोणतीही ठोस माहिती नाही. त्यामुळे जोपर्यंत पर्यायी नियोजनाचा विचार होत नाही तोपर्यंत हा पूल बंद करण्याचा निर्णय तडकाफडकी कसा काय घेतला जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया खुद्द वाहतूक पोलिसांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली या स्थानकाला लागून असलेल्या कोपर पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात आता हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याने डोंबिवली पश्चिम भागातील कोपर, मोठागाव, उमेशनगर, विष्णुनगर, देवीचा पाडा, गरीबाचा वाडा या भागांमधली वाहने आणि त्यांची वाहतूक रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा फुले रस्त्यावरून भाषाप्रभू पु. भा.भावे सभागृहासमोरून रेल्वे मैदानाजवळून ठाकुर्ली पुलाने डोंबिवली पूर्व भागात जातील. असे नियोजन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पश्चिमेतून पूर्वेकडे जाण्यासाठी ठाकुर्ली पुलाचा पर्यायच उरला आहे.

डोंबिवली पूर्वेतील वाहन चालक पश्चिमेत येताना घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा-प्लाझमा रक्तपेढी-व्ही. पी. रस्ता-स. वा. जोशी शाळा ते ठाकुर्ली पूल या रस्त्याने येणार आहे. जोशी शाळेजवळील रस्ता निमुळता आहे. या रस्त्यावर संध्याकाळी नेहमी कोंडी असते. या रस्त्यावरही कोपर पूल बंद केल्यानंतर भार येणार हे स्पष्ट आहे. काही वाहने ९० फुटी रस्त्याने ठाकुर्ली हनुमान मंदिर, रेल्वे रस्ता-सारस्वत कॉलनीमधून-जोशी शाळा किंवा फडके रस्ता येथे निघणार आहे. पेंडसेनगर, सारस्वत कॉलनीतील रस्ते अरुंद आहेत. या अरुंद रस्त्यामुळे ठाकुर्ली उड्डाण पूल उद्घाटनाचा जाहीर कार्यक्रम सत्ताधारी पक्षांना रद्द करावा लागला होता.

पूर्व भागातील काही वाहने फडके रस्त्याने गणेश मंदिर किंवा एचडीएफसी बँकेसमोरुन, नेहरु रस्त्याने ठाकुर्ली रस्त्याकडे येतील. नेहरु उद्याानाजवळील बगीचा गणेश मंदिर संस्थानने सुरू केला आहे. याठिकाणी संध्याकाळी बालगोपाळ, पालकांची अभूतपूर्व गर्दी असते. या भागातून वाहने चालविताना जपून चालवावी लागणार आहेत. अशीच परिस्थिती जोशी शाळे जवळ असणार आहे. त्यामुळेच कोपर दिशेचा पूल बंद होणं ही डोंबिवलीकरांना त्रासदायक ठरणारा निर्णय आहे असेच म्हणता येईल.