औद्योगिक क्षेत्रातील स्फोट, आगीने अवघे शहर हादरले

कानठळय़ा बसवणारा आवाज, त्यापाठोपाठ थरारलेली जमीन आणि काही सेकंदांतच फुटलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा.. नेमके काय झाले हे जाणून घेतण्यासाठी झालेला गोंधळ आणि मग घटनास्थळापासून जितक्या दूर पळता येईल तितक्या दूर पळण्यासाठी उडालेली धांदल..मग अग्निशमन बंब, रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाज आणि एकूणच झालेली वाहतूक कोंडी.. डोंबिवलीने गुरुवारी सकाळी  साडेअकरापासून दिवसभर अनुभवलेला हा थरार केवळ त्या शहरालाच नव्हे आसपासच्या शहरांनाही धक्का लावून गेला. औद्यागिक क्षेत्रातील स्फोट आणि भीषण आगीनंतर दूरवर पसरलेले काळय़ा धुराचे लोट यामुळे डोंबिवली पुरती हादरून गेली.

डोंबिवलीतील गांधीनगर येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने अवघ्या शहरावर दहशत पसरवली. कंपनीत झालेल्या स्फोटाचा आवाज अगदी उल्हासनगपर्यंत पोहोचला तर स्फोटाच्या हादऱ्याने तीन-चार किलोमीटरच्या परिसरातील इमारती, दुकानांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, दरवाजे निखळले. स्फोटग्रस्त कंपनीतील यंत्रांचे भाग उडून रहिवासी वस्तीत, रस्त्यांवर जाऊन पडले यातही अनेकांना दुखापत झाली.  उद्योगनगरी येथील द लक्ष्मी कृपा सहकारी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये चक्क वीस किलो वजनमाप येऊन कोसळले होते, अशी माहिती येथील रहिवासी सुधाकर शेट्टी यांनी दिली. तर परिसरातील एका पिठाच्या गिरणीचे छप्पर उडून गेले. परिसरातील गोडाऊन, बैठय़ा चाळींचे पत्रे उडून गेले, अशी माहिती विशाल मेहता या तरुणाने दिली.परिसरात उभ्या असलेल्या गाडय़ांच्या काचाही फुटल्या. गांधीनगर, महावीरनगर, उद्योगनगरी परिसरातील अनेक सोसायटय़ांच्या रहिवाशांच्या घराच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. स्फोटाचा धक्का बसून अनेक दुकानांचे दरवाजे पूर्णपणे वाकून गेले होते.

या स्फोटामुळे कंपनीची इमारत पूर्णपणे कोसळली तर आजूबाजूच्या इमारतींचीही पडझड झाली. स्फोटानंतर एमआयडीसीमधील बहुसंख्य कारखाने बंद करून तेथील कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले. तर परिसरातील अनेक इमारती आणि चाळींमधील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते.

पादचारीही गंभीर जखमी

एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला असलेले भरत धर्माधिकारी सकाळी या परिसरातून जात असताना स्फोट झाल्याने ते जखमी झाले. या धक्क्याने ते लांबपर्यंत फेकले गेले. त्यांच्या डोळ्याला, कपाळाला दुखापत झाली. तसेच दोन्ही कानाचे दडे बसले होते.

मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी

बालाजी दर्शन या इमारतीमध्ये राहणाऱ्या रेखा कोळी या आपल्या दोन छोटय़ा मुलींना घेऊन इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या सुरक्षा भिंतीवरून चढल्या. मात्र, खाली उतरत असताना  भिंतीवरून पडून त्या गंभीर जखमी झाल्या.

काचांच्या माऱ्याने जखमी

उद्योगनगरी परिसरातील मंगलमुर्ती बिल्डींगमध्ये राहणारे साहिल पाटील आणि रवींद्र वालावलकर हे दोघे इमारतीच्या काचा फुटल्याने गंभीर जखमी झाले. तर इमारतीच्या खाली उभे असलेले ट्रकचालक रमेश शिंदे ट्रक पुसत असताना अचानक झालेल्या अपघातामुळे इतके घाबरले की सुरक्षित स्थळ गाठण्यासाठी ते चक्क ट्रकच्या खाली जाऊन बसले. मंगलमूर्ती इमारतीच्या खालील दुकानात उभे असलेले प्रवीण पाटील या धक्क्याने तीन ते चार फूट लांब उडून पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यांनाही इमारतींच्या काचांमुळे दुखापत झाली.