औद्योगिक क्षेत्रातील संतप्त रहिवाशांचा आक्रोश; डोंबिवलीचे ‘भोपाळ’ होण्याची भीती

डोंबिवली शहरात औद्योगिक क्षेत्र आणि रहिवासी भागाची इतकी सरमिसळ झाली आहे की, या दोघांचा भेद करणेही कठीण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात वाढत्या लोकवस्तीवर नियंत्रण आणण्याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पावले उचलली जात नसतानाच रहिवासी वस्त्या आणि औद्योगिक परिसरातील सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. गुरुवारच्या दुर्घटनेने अवघ्या शहराला हादरवले असले तरी या घटनेनंतर योग्य कार्यवाही न झाल्यास भविष्यात डोंबिवलीत भोपाळ वायू दुर्घटनेसाठी घटना घडेल, अशा शब्दात एमआयडीसी परिसरातील रहिवाशांनी आपला संताप व्यक्त केला. औद्योगिक क्षेत्रातील घातक कंपन्या येथून दुसरीकडे हलवा अथवा आम्हाला तरी येथून स्थलांतरित करा, असा सूर येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये गुरुवारी लागलेल्या स्फोटानंतर परिसरात मदतकार्य सुरू असताना लोकप्रतिनिधींनी परिसराला भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या औद्योगिक नियमावलींचे पालन होत नाही. कंपन्यांमध्ये अत्यंत घातक रासायनिक प्रक्रिया कोणत्याही प्रकारची माहिती नसलेल्या अकुशल कामगारांकडून करून घेतल्या जातात. सुरक्षेच्या कोणतीच काळजी घेतली जात नाही. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने हा परिसर धोकादायक बनला आहे. भविष्यात इथे होणारा अपघात हा भोपाळइतकाच घातक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवासी दीपक भानुशाली यांनी दिली.

मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेतेही मदतीसाठी धाव घेतात. मात्र अपघातांची तीव्रता संपली की मात्र प्रत्येकजण जिकडे-तिकडे निघून जातो आणि आमचा प्रश्न वर्षांनुवर्षे कायम राहतो. या परिसरात वारंवार लागलेल्या आगी आणि स्फोटामुळे अनेक कुटुंबाना मोठा फटका सहन करावा लागला आहे, असे मत प्रकाश घोलप या नागरिकाने व्यक्त केले.

डोंबिवलीत राहणे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी आमची परिस्थिती झाली आहे. येथील प्रदूषणामुळे आजारांनी माणसे मरत आहेत तर दुसरीकडे अचानक होणाऱ्या स्फोटातून हजारोंचा मृत्यू होत आहे. हे असे सतत मृत्यूचे सावट असलेल्या जीवनाचा कंटाळा येऊ लागला आहे. त्यामुळे एक तर हे औद्योगिक क्षेत्र येथून हटवा अन्यथा आम्हा रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित करा, अशी मागणी रहिवाशांनी केली.