ऋषिकेश मुळे-आशीष धनगर

वाहतूक बदल, नागरिकांना माहिती न देताच निर्णय घेतल्याने नाराजी; समाजमाध्यमांवरूनही टीका

डोंबिवली : डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा कोपर पूल कमकुवत झाल्याने येत्या २७ मेपासून मध्य रेल्वे प्रशासनाने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वकल्पना देण्यात न आल्याने तसेच संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कोणतेही बदल करण्यात न आल्याने डोंबिवलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कोपर पूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिल्यानंतर मध्य रेल्वेने तो सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर हा पूल बंद केल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. कोपर पूल बंद झाल्यानंतर पश्चिमेतून पूर्वेत जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपूल हा चालकांना एकमेव मार्ग आहे. अगोदरच अरुंद असणाऱ्या या पुलावर सर्व वाहतूक वळल्यास अर्धा-अधिक वेळ कोंडीतच जाणार असल्याचे स्थानिक वाहनचालकांनी सांगितले.

परिवहन बस गाडय़ांना अडथळा

नवी मुंबई महापालिकेच्या बस क्रमांक ४१ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली, बस क्रमांक ४२ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली पश्चिम मार्गे कोपरखैरणे, बस क्रमांक ४४ बेलापूर रेल्वे स्थानक ते डोंबिवली पश्चिम येथे जातात. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी या गाडय़ा गर्दीने तुडुंब भरलेल्या असतात. मात्र कोपर पूल बंद झाल्यानंतर या बसच्या थांब्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

नेटकरींची संतप्त प्रतिक्रिया

‘‘आतलं गुपित- कोपर पूल दुरुस्तीसाठी रेल्वेकडे पैसे जमा करायला महापालिकेकडे पैसाच नाही.. कोपर पुलाचा ‘पत्री’ पूल करू नका’’ अशा प्रकारचे संदेश मेम्सच्या माध्यमातून समाजमाध्यमावर मोठय़ा प्रमाणावर फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आम्ही डोंबिवलीकर’ तसेच ‘डोंबिवलीकर रॉक्स’ या ट्विटर आणि फेसबुक पेजवर डोंबिवलीतील नागरिक डोंबिवलीतल्या जुन्या पुलाच्या आठवणी संदेशाद्वारे जाग्या करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही नेटकरी पुलाच्या बंदविषयी आणि कामाविषयी खिल्ली उडवताना दिसले.

‘निवडणुकीसाठी थांबलात का?’

कोपरचा पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लोकसभा निवडणुका संपण्याची वाट पाहिली का, असा सवालही डोंबिवलीकरांमधून व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम करणे खरे तर रहिवाशांसाठी त्रासदायक आहे. मात्र या कामाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी केली असती तर त्रासलेल्या डोंबिवलीकरांचा राग मतपेटीतून व्यक्त झाला असता. या भीतीपोटी सत्ताधारी पक्षाने हे काम लांबविले का, असा सवाल डोंबिवलीतील प्रवासी बुधवारी व्यक्त करताना दिसत होते. काम करा, पण वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अन्यथा विधानसभा निवडणुकांचे घोडा मैदान दूर नाही, अशी प्रतिक्रियाही काही प्रवाशांनी व्यक्त केली.

आमच्याकडे पुलाच्या बंदविषयीचे कोणत्याही प्रकारचे पत्र अधिकृतरीत्या अद्याप आलेले नाही. पूल बंद झाल्यास तसे वाहतूक नियोजन करण्यास आम्ही समर्थ आहोत. नागरिकांना पूल बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी त्रास होऊ शकतो.

– सतेज जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक शाखा