डोंबिवलीतील सावरकर मार्गावरील वाहनतळाच्या आरक्षित जागेवर गेल्या कित्येक महिन्यांपासून बेकायदा झोपडी बांधण्यात आली आहे. या झोपडीच्या मालकाचे ‘राजकीय वजन’ असल्याने ही झोपडी हटविण्यास पालिका कर्मचारी कसूर करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अखेर स्थानिक नगरसेविकेने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे तक्रार केली असून, ही झोपडी हटविण्यासाठी खडसेंना साकडे घातले आहे.
 सावरकर रस्त्याला खेटून वाहनतळाचे आरक्षण आहे. या आरक्षणावर कैलास डोंगरे यांनी एक झोपडी बांधून त्यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे फर्निचरचे साहित्य, यंत्र ठेवली आहेत. ही झोपडी हटवण्यासाठी सावरकर रस्ता प्रभागाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ‘फ’ प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांच्या पथकाने ही झोपडी तोडली होती. ‘आपण स्वत: ही झोपडी, तेथील साहित्य हटवतो’ असे आश्वासन डोंगरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. दहा दिवस उलटले तरी ही तोडलेली झोपडी ‘जैसे थे’ असून तेथील सामुग्रीही हटवण्यात आली नाही, असे नगरसेविकेच्या निदर्शनास आले.
ही झोपडी येत्या आठवडाभरात तोडण्यात आली नाही तर पालिकेसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेविकेने दिला आहे.