डोंबिवलीकरांना पुन्हा महिन्याभराची प्रतीक्षा; भाजप नेत्यांना बाजूला ठेवत शिवसेनेची कुरघोडी
डोंबिवलीतील स्कायवॉकच्या छताचे काम पूर्ण होऊनही काही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तो खुला करण्यात येत नव्हता. शेवटी प्रवाशांच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी रात्री घाईघाईने खुला करण्यात आला. मात्र रेल्वेने पादचारी पुलांचे काम हाती घेतल्याने प्रवाशांना एक महिना वाट पाहावी लागणार आहे.
राजकीय नेत्यांनी श्रेय लाटण्यासाठी स्कॉयवॉकचा शुभारंभ लांबणीवर टाकल्याचे चित्र होते. मात्र प्रवाशांच्या संतापनंतर गुरुवारी रात्री झकपक विजेची व्यवस्था करत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी स्कॉयवॉक खुला केला. या वेळी भाजपचे स्थानिक आमदार किंवा लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे स्कॉयवॉकच्या शुभारंभाच्या मुद्दय़ावर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत.
स्कायवॉक दोन दिवसांत खुला केला नाही तर प्रवासीच खुला करतील, असा इशारा जागृती सेवाभावी संस्थेकडून देण्यात आला होता. त्यामुळे या मुद्दय़ावरून शहरातील राजकीय वातावरण तापले होते. कोणताही वाद नको म्हणून स्कायवॉक चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे डोंबिवलीतील नेते दीपेश म्हात्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपला शह देण्यासाठी ही खेळी करण्यात आली आहे का याची चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे. छताचा स्कायवॉक खुला झाला असला तरी रेल्वेने पादचारी पुलाचे काम सुरू केल्याने प्रवाशांना अजून एक महिना तरी या स्कायवॉकचा वापर करता येणार नाही, असे सांगितले जात आहे.
रेल्वे पूल बंद
छत बसविण्याच्या कामासाठी स्कायवॉक प्रवाशांसाठी दोन महिने बंद होता. आता स्कायवॉक खुला झाल्यावर मध्य रेल्वेने मुंबई दिशेकडील फलाट क्र. १ व २ च्या रेल्वे फलाटांवरील पादचारी पुलांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू केल्याने हा पूल एक महिना ये-जा करण्यासाठी बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर यामुळे प्रवासी पुन्हा नाराजी व्यक्त करत आहेत.

विष्णुनगर प्रवेशद्वार खुले करा
रेल्वे स्थानकातून डोंबिवली पश्चिमेकडे येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचा लोंढा एक महिना विष्णुनगर प्रवेशद्वारावर आदळणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडील व्होडाफोन गॅलरीसमोरील बंदिस्त करून ठेवलेला पादचारी पूल प्रवाशांना खुला करावा अशी मागणी होत आहे.