गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणी करायची असल्यास मर्यादित आकारात रस्त्यावर खोदकाम न करता मंडप उभारावा, असा स्पष्ट नियम कल्याण-डोंबिवली महापालिकेने जाहीर केला असतानाही डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील सुभाष रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर खड्डे पाडण्यात आल्याचे शुक्रवारी दिसून आले. विशेष म्हणजे वर्दळीच्या अशा या रस्त्याचा मोठा भाग या मंडपासाठी व्यापण्यात येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुभाष रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कोपऱ्यावर शुक्रवारी सकाळपासून मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तीस फुटी रुंदीच्या या रस्त्याच्या मधोमध खड्डे खणण्यात आले आहेत. या रस्त्याच्या कोपऱ्यावर रिक्षा वाहनतळ आहे. रस्त्याला लागूनच लहान मुलांचा दवाखाना, रुग्णालय, बँक आहे. दुचाकी वाहने वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून या रस्त्यावर उभी केली जातात. अशा परिस्थितीत महापालिकेने या मंडप उभारणीला परवानगी दिलीच कशी असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. सकाळपासून या भागात मंडप उभारणीसाठी वासे आणण्यात आले. वासे उतरवणे, खड्डे खोदण्याची कामे सुरू झाल्यापासून या भागात वाहतूककोंडीस सुरुवात झाली आहे. रेल्वे स्थानक भागात पालिका आणि पोलिसांनी मंडपांना परवानगी देऊ नये अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, यासंदर्भात ‘ह’ प्रभागाचे अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता, याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘विविध मंडळांकडून उत्सवासाठी परवानगी मागणारे अर्ज आले आहेत. जागा पाहणी करून मंडप परवानगी देण्यात येते. परवानगीचे पत्रक मिळाले आहे. सुभाष रस्त्यावर मंडप उभारणीसाठी नियमानुसार परवानगी घेतली आहे का हे पाहण्यात येईल. परवानगी नसेल तर कारवाई केली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.