सह्य़ाद्री डोंगर सह्य़ाद्री डोंगर रागांमध्ये प्रस्तरारोहणासाठी सर्वात अवघड समजला जाणारा ‘बाण’ सुळका नुकताच डोंबिवलीतील ‘आम्ही गिर्यारोहक’ आणि पनवेलच्या ‘निसर्गमित्र’ या दोन संस्थांच्या गिर्यारोहकांनी सर केला.
बाण हा सुळका साम्रद गावाजवळील हल्ली ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या सांधण दरीला लागून आहे. तरीही आधी बाणच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत कसरतच करावी लागते. या सुळक्याची उंची अंदाजे ६०० फूट आहे.
गेल्या १० वर्षांत येथे कुणीही गेले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष मोहिमेआधी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात संस्थेतील काही जण तिथे गेले. तेव्हा बाणच्या पारंपरिक प्रस्तर मार्गात आणि त्या परिसरात दहा-बारा मधमाशांची पोळी आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन त्यांनी घळीच्या मार्गाने चढाई करण्याचा निर्णय घेतला. घळीतून प्रस्तराच्या पायथ्यापर्यंत पोचायला २०-२५ फुटांची चिमणी पार करावी लागते.
घळीच्या मार्गानेही पोळी असली तरी ती ५० ते ६० फुटांवर होती. मात्र गिर्यारोहकांनी तेवढा धोका पत्करायचा निर्णय घेतला. सतत उठणाऱ्या मधमाश्यांमुळे कधी कधी चढाई बराच वेळ थांबवावी लागायची, त्यामुळे साहजिकच वेळ जास्त लागत होता. कधीही घसरणारे दगड, त्यामुळे खाली उभ्या असलेल्यांवर सतत दगडांचा मारा होत होता. नैसर्गिक व कृत्रिम पद्धतीच्या प्रस्तरारोहणाचा वापर करून, जुने बोल्ट गंजले असल्याने त्याला कॉर्डस टाकून, गरज वाटेल तिथे नवीन बोल्ट मारून दोन दिवसाच्या मेहनतीनंतर बाणचा माथा गाठण्यात या गिर्यारोहकांना यश आले. पुढील दीड दिवसात घळीपासून वपर्यंत लावलेल्या दोरीवर झुमारिंग पद्धतीने टीमच्या सर्व सदस्यांनी बाणच्या सर्वोच्च ठिकाणी हजेरी लावली.

यांचा होता सहभाग
या मोहिमेत आम्ही गिर्यारोहक संस्थेचे सुमुख सातवळेकर, राज बाकरे, अभिषेक वैद्य, अमोल पाध्ये, प्रतीक पाटील, त्रिवेणी केसकर, नेहा शेट, पल्लवी भोर, वैदेही केसकर, तसेच निसर्गमित्रचे राहुल खोत, पराग सरोदे, विनायक कानिटकर, प्रशांत जगनाडे आणि वरद पवार यांचा सहभाग होता. टीममधील सदस्यांबरोबरच सह्य़ाद्री अ‍ॅडव्हेंचर क्लब, कैवल्य वर्मा, नंदू चव्हाण, गणेश गीध यांचासुद्धा मोहीम यशस्वी होण्यात हातभार लागला.