अग्निशमन दलाचा कल्याण-डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर
प्रोबेस कंपनीमधील स्फोट हा अतिशय तीव्र असल्याने या घटनेचे निश्चित कारण अग्निशमन विभागासही कळलेले नाही. याकरिता विविध तज्ज्ञांचे मत व न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच घटनेचे निश्चित कारण समजू शकेल, अशा आशयाचा अहवाल अग्निशमन दलाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला सादर केला आहे. त्यामुळे डोंबिवली स्फोटाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे ला स्फोट झाल्याने भीषण आग लागली होती. सुरुवातीला कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली होती. परंतु नंतर या स्फोटाची तीव्रता पाहता हा स्फोट बॉयलरचा नसल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन विभागाने महापालिकेला सादर केलेल्या अहवालामध्ये अग्निशमन दलास कंपनीच्या मागील बाजूस २३ नग प्रोप्रोईझल अल्कोहोलचे ड्रम्स सुस्थितीत आढळून आले. हे ड्रम्स घटनास्थळी उपस्थित असलेल्या केमिकल तज्ज्ञांच्या देखरेखीमध्ये लगतच्या दुसऱ्या कंपनीमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर कंपनीमध्ये वापरण्यात येणारे व ढिगाऱ्याखाली दबलेले १२ ते १३ थायोनिल क्लोराइड या टॉक्सीस रसायनाच्या ड्रम्समुळे बचावकार्यात अडथळा येत होता. पावसाळी वातावरण असल्याने रसायनावर पाऊस पडल्यास निर्माण होणारी परिस्थिती पाहता केमिकल तज्ज्ञांच्या सल्ल्याने ती रसायने ढिगाऱ्याखालून काढून ते रासायनिक ड्रम्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सव्‍‌र्हिस तळोजा येथे हलविण्यात आले. जे ड्रम्स लिकेज झाले होते त्यावर लाइम पावडर टाकून न्युट्रलाइज करण्यात आले. तसेच झायोनिल रसायनाचे ड्रम्सही या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते तेही सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.