आगडोंबिवली

प्रोबेस कंपनीतील स्फोटाने निवासी भागातील अडीच हजारांपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. या स्फोटात घरांमधील खिडक्यांच्या, दरवाजांच्या काचा फुटल्या असून छताच्या पत्र्यांचे तसेच फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे.भरपाईची वाट न पाहता  रहिवाशांनी अखेर घरांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. औद्योगिक पट्टय़ाच्या परिसरात खिडक्या बसविण्याची कामे जागोजागी सुरू झाल्याचे दिसत असून अनेक ठिकाणी काचा उपलब्ध होत नसल्याने कामे रेंगाळत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

डोंबिवली स्फोटात नुकसान झालेल्या २७६३ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानीची अंदाजित रक्कम ठरविण्यात आली आहे. पंचनाम्यात काचा फुटून झालेल्या नुकसानीची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. छताचे पत्रे व स्फोट झालेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या घरांतील फर्निचरचे झालेले नुकसान त्यापाठोपाठ आहे. शासनाला यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतरच भरपाई मिळू शकणार आहे.  सुरुवातीला पंचनामे ठोस पद्धतीने व्हावेत यासाठी रहिवाशांनी दुरुस्तीची कामे टाळली. परंतु पावसाळा तोंडावर आल्याने घराघरांमध्ये दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत.

काचांची मागणी वाढली

स्फोटात स्लायडिंगचे नुकसान मोठय़ा प्रमाणात झाल्याने काचांच्या मागणीत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती प्रभात ग्राफिक्स प्रा.लि.चे दिनेश राठोड यांनी दिली. घरे बंद असल्याने काचा मोठय़ा प्रमाणात फुटल्या. शहरात सुरू असलेली आधीची कामे आणि अचानक या भागातून झालेल्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे माल कमी पडू लागल्या असून कंपनीतून तो यायलाही उशीर होत आहे. डोंबिवलीमध्ये घाऊक काचांचे तीन व्यापारी असून सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. तामिळनाडू व गुजरात या राज्यातून काचा येथे आणल्या जातात. दर्जानुसार ३० ते ९० रुपये फूट अशी काचांची किंमत आहे.

स्लायिडगलाही मोठी मागणी

काचांसोबत स्लायिडगलाही मोठी मागणी आहे, अशी माहिती स्लायडिंग बसविण्याचा व्यवसाय करणारे अंबे भवानी दुकानाचे मालक बबन सुर्वे यांनी दिली. स्फोटात काही ठिकाणी स्लायडिंगच्या चौकटीही वाकल्या आहेत. स्लायडिंगच्या मागणीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्लायडिंग लावण्याचा खर्च हा आकारमानानुसार असतो. त्यामुळे मजुरी, अ‍ॅल्युमिनिअम, रबरचा खर्चही त्यात येतो. अ‍ॅल्युमिनिअमच्या दर्जानुसार १५० रुपयांपासून ते ४५० रुपये फूट असे त्याचे भाव आहेत. त्यामुळे खर्च दहा हजारापासून पुढे जाऊ शकतो.

मजुरांना मिळाला रोजगार

स्फोटामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. छतांचे पत्रे तुटल्याने ते बसविण्याचे काम मोठे आहे. दुकानदारांकडेही मजुरांची कमतरता असल्याने नाक्यावरील कामगारांना रोजगार मिळाला आहे. छोटी-मोठी कामे त्यांना मिळाली आहेत. पाच सहा दिवसांपासून त्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

इमारतींची कामे तर आहेतच मात्र जास्तीचे कामही आम्हाला या स्फोटातील घरांचे नुकसान झाल्याने मिळाले आहे. जादा काम म्हणून सायंकाळी पाचनंतर या ठिकाणी काम करण्यास आम्ही जात आहोत.   दिवसाला तीनशे ते चारशे रुपये मजुरी मिळत असल्याचे शांताराम ढगे या मजुराने सांगितले.