खवय्ये मत्स्य मेजवानीपासून वंचित

डोंबिलीतील तीन दिवसांच्या खाद्य महोत्सवासासाठी ग्राहकांकडून प्रवेश शुल्क आकारून महोत्सवासाचे आयोजनच न केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. संतप्त ग्राहकांनी आयोजकांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

मुलुंड येथील मितेश गुप्ते व सहकाऱ्यांनी डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी इस्टेट मैदानावर २४ ते २६ मे तीन दिवसांचा ‘मत्स्य मेजवानी रुचकर थाळी’ महोत्सव आयोजित केला होता. शुक्रवारी पहिल्या दिवशी शेकडो ग्राहक महोत्सवाच्या ठिकाणी आले असता त्यांना तेथे रिकाम्या खुच्र्या आणि शुकशुकाट दिसून आला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर ग्राहकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात संयोजकांविरुद्ध तक्रार केली.

शुक्रवारी संध्याकाळी नोंदणीकृत ग्राहक कुटुंबीयांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. संयोजकांचे प्रतिनिधी अरुण शिंदे यांनी मासळीचा ट्रक येण्यास उशीर झाल्याने खाद्य पदार्थ उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले. ग्राहकांनी पैसे परत मागितले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. ग्राहकांनी संयोजकांनी दिलेल्या वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्यापैकी काही मोबाइल अवैध तर काही बंद आढळले.

ग्राहकांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठून संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चवरे यांनी त्यास नकार देत, तपासानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे सांगितले. महोत्सवासाठी ग्राहकांनी ५०० रुपयांपासून ते दोन हजारापर्यंत प्रवेश तिकिटे काढली आहेत.

‘आपण नेटबँकिंग माध्यमातून महोत्सवासाठी १८०० रुपये भरणा केलेत. या कार्यक्रमासाठी दीड तासाचा प्रवास करून कुटुंबासह आपण नवी मुंबईतून येथे आलो आहोत. पैसे परत देण्याची हमी नसल्याने संयोजकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे,’ असे आनंद मुदलीयार यांनी सांगितले.

चेंबूर येथून तेज म्हात्रे कुटुंबासह आले होते. त्यांचीही अशाच प्रकारची फसवणूक झाली आहे. रविवारी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती सुनील प्रधान यांनी व्यक्त केली. अधिक माहितीसाठी संयोजकांच्या १० मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ते अवैध आणि बंद असल्याचे आढळून आले.  याप्रकरणी तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत, असे मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.