ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्याबरोबरच काळानुरूप बदल स्वीकारत हायटेक बनण्याचा निर्णय भारतीय टपाल विभागाने घेतला असला तरी सध्याची टपाल कार्यालयांची अवस्था पाहाता ही हायटेक सुविधा लांब राहिली किमान त्या कार्यालयाकडे व त्यातील कर्मचाऱ्यांकडे तरी लक्ष द्या, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करू लागले आहेत. डोंबिवलीतील रामनगर टपाल कार्यालयाचे प्लॅस्टर (गिलावा) पहिल्या पावसातच कोसळले आणि कार्यालयाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
डोंबिवली शहरात टिळकनगर, रामनगर, विष्णूनगर आणि मानपाडा अशी एकूण चार टपाल कार्यालये आहेत. त्यातील विष्णूनगर टपाल कार्यालयाची अवस्था अगदीच बिकट आहे. अशीच अवस्था प्रीमिअर कॉलनी येथे असलेल्या मानपाडा कार्यालयाची होती. कोंदट वातावरणात, गोदामाचे स्वरूप प्राप्त झालेल्या आणि डोक्यावरील छत कधी कोसळेल याची शाश्वती नसलेल्या स्वरूपात येथील कर्मचारी काम करीत होते. अखेर स्लॅबचा काही भाग कोसळल्याने अधिकाऱ्यांनी टपाल कार्यालयालाच टाळे ठोकले. त्यानंतर ते मदन ठाकरे चौकातील टपाल कार्यालयात हलविण्यात आले. मात्र अपुऱ्या जागेमुळे पश्चिमेतील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. हे पाहून गेल्या वर्षी खासदारांच्या पाठपुराव्यामुळे विष्णूनगर टपाल कार्यालय पालिका शॉपिंग सेंटरच्या जागेत दोन वर्षांच्या करारावर हलविण्यात आले. हीच अवस्था मानपाडा टपाल कार्यालयाचीही झाली होती. २० ते २५ वर्षे जुन्या प्रीमिअर कॉलनीच्या धोकादायक इमारतीतील अगदी छोटय़ा जागेत या टपाल कार्यालयाचा कारभार सुरू होता. इथेही दोनतीन वर्षांपूर्वी छत कोसळण्याच्या घटना घडल्या. सीमेंट लावून तात्पुरती दुरुस्ती करूनही काही उपयोग नव्हता. अखेर हे टपाल कार्यालयही एमआयडीसीतील टपाल कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले आहे.

’यंदा रामनगर टपाल कार्यालयाच्या स्लॅबचा काही भाग पहिल्या पावसातच कोसळला.
’टिळकनगर टपाल कार्यालयाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या टपाल कार्यालयाची एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही.
’पावसाच्या पाण्यामुळे फाइल्स व कागदपत्र ओली होण्याची भीती कर्मचाऱ्यांना सतावते.
’पेन्शनसाठी अनेक ज्येष्ठ नागरिक टपाल कार्यालयात येतात. मात्र तेथे बसण्याची सोय नसल्याने रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.
’कार्यालयातील भिंतींचे रंग उडालेले आहेत. स्लॅबमधील लोखंडी सळई दिसत आहे. पार्सलचा ढीग आणि कोंदट वातावरण अशा अवस्थेत जीव मुठीत धरूनच कर्मचारी काम करतात.